Ravindra Jadeja: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक (Border-Gavaskar Cup) स्पर्धेतील दुसरा सामना सध्या खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला होता. त्यानंतर आता शुक्रवारी अरूण जेटली मैदानात दुसरी टेस्ट मॅच खेळवली जात आहे. अशातच आता प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताला सुर गवसल्याचं पहायला मिळतंय. पहिल्याच दिवशी फिरकीची जादू पहायला मिळाली आहे.
प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली. एकीकडे उस्मान ख्याजा कडवी झुंज देत असताना बाकीचे फलंदाज पटापट माघारी परतले. भारतासाठी ख्वाजाला बाद करणं महत्त्वाचं होतं. त्यावेळी भारताचा स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा याने ख्वाजाला फिरकीत फसवलं आणि नवा इतिहास रचला आहे.
रविंद्र जडेजा 250 कसोटी बळी आणि 2500 कसोटी धावा करणारा सर्वात वेगवान भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरला आहे. रविंद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा 8वा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने 62 व्या सामन्यात ही कामगिरी केली.
Milestone - @imjadeja becomes the fastest Indian and second fastest in world cricket to 250 Test wickets and 2500 Test runs #INDvAUS pic.twitter.com/FjpuOuFbOK
— BCCI (@BCCI) February 17, 2023
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दुखापत झाल्यानंतर रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर तो सहा महिन्यांहून अधिक काळ मैदानापासून दूर राहिला होता. त्यानंतर आता त्याने जोरदार कमबॅक केल्याचं पहायला मिळालं होतं. पहिल्या टेस्टमध्ये जडेजाने 7 विकेट काढत ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं होतं.