नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या एकदिवसीय सामन्यात (IND vs ENG) इंग्लंडने 6 गडी राखून विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेचा निर्णायक सामना आज पुण्यात रंगणार आहे.कसोटी आणि टी -20 मालिका जिंकल्यानंतर अशा परिस्थितीत टीम इंडियाची नजर एकदिवसीय मालिका जिंकण्यावर असेल. हे करण्यासाठी टीम इंडियाच्या काही खेळाडूंना दमदार खेळ दाखवावा लागेल. आजच्या सामन्यात ज्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरू शकते अशा खेळाडूंवर एक नजर टाकू.
टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला आजच्या सामन्यात आपली ताकद दाखवावी लागेल. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात रोहितची कामगिरी काही खास नव्हती. दोन्ही सामन्यात त्याने एकूण 53 धावा केल्या आहेत. जर भारताला मालिका जिंकायची असेल तर रोहितची कामगिरी खूप महत्वाची ठरणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली. परंतु कोहलीच्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा या दोन्ही सामन्यात संपली नाहीय. पहिल्या सामन्यात विराटने 56 आणि दुसर्या सामन्यात 66 धावा केल्या. विराटकडूा शतक ठोकण्याची अपेक्षा केली जाईल.
टी -20 मालिकेमध्ये फ्लॉप झालेल्या केएल राहुलने वनडे मालिकेत शानदार पुनरागमन केले. दुसर्या वनडे सामन्यातही राहुलने शानदार शतक ठोकले. याशिवाय पहिल्या सामन्यात राहुलनेही नाबाद 62 धावा केल्या. टीम इंडियाला विजय मिळवायचा असेल तर तिसर्या सामन्यातही राहुलला आपली चमक दाखवावी लागेल.
एकदिवसीय मालिकेत पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याने दुसर्या वनडेत 6 षटकांत 72 धावांची लूट केली. फलंदाजीसह त्याची कामगिरी चांगली झाली आहे. त्याच्या पहिल्याच सामन्यात क्रुणालने नाबाद 58 धावांची खेळी केली. टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी कृणालला आपला अष्टपैलू खेळ दाखवावा लागेल.
कृणालप्रमाणेच प्रसिद्ध कृष्णानेही या मालिकेतून पदार्पण केले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रसिद्धने 4 विकेट घेऊन लक्ष वेधून घेतलेय. दुसर्या सामन्यात टीम जिंकली नसली तरी प्रसिद्धने उत्तम बॉलिंगच्या जोरावर 2 विकेट घेतले. निर्णायक सामन्यात त्याला आपला खेळ दाखवावा लागणार आहे.
आजच्या सामन्यात युजवेंद्र चहलला कुलदीप यादवच्या जागी संघात स्थान मिळू शकते. टीमला जिंकवण्यासाठी चहलला पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवावी लागणार आहे.