ऑकलंड : भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये अर्धशतकी खेळी केली. जडेजा ७३ बॉलमध्ये ५५ रन करुन आऊट झाला. संघर्षमय खेळी केल्यानंतरही जडेजाला भारताला जिंकवता आलं नाही, पण तो एमएस धोनी आणि कपिल देव यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पुढे गेला आहे.
रवींद्र जडेजाने सातव्या क्रमांकावर बॅटिंग करताना सातव्यांदा अर्धशतक केलं आहे. जडेजा सातव्या क्रमांकावर सर्वाधिक ७ वेळा अर्धशतक करणारा पहिला भारतीय बॅट्समन ठरला आहे. जडेजा ४९व्या ओव्हरला आऊट झाला. जडेजाची विकेट जाताच भारताने हा सामना गमावला. जडेजाच्या विकेटसोबतच न्यूझीलंडने वनडे सीरिजही खिशात टाकली.
धोनी आणि कपिल देव यांच्या नावावर सातव्या क्रमांकावर प्रत्येकी सहा-सहा अर्धशतकं आहे. जडेजाचं वनडे क्रिकेटमधलं हे १२वं अर्धशतक आहे. जडेजाची ऑकलंडच्या मैदानातली ही लागोपाठ दुसरी शानदार कामगिरी आहे. २०१४ साली जडेजाने ४५ बॉलमध्ये ६६ रन केले होते. जडेजाच्या या खेळीमुळे ही मॅच टाय झाली होती.
२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्ध संघर्ष केला होता. आठव्या क्रमांकावर खेळताना जडेजाने ५९ बॉलमध्ये ७७ रन केले होते. जडेजा आणि धोनीच्या त्या पार्टनरशीपमुळे भारताच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशा पल्लवीत होत्या, पण जडेजा आणि धोनीची विकेट गेल्यानंतर भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.