दुबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारतविरुद्ध पाकिस्तान काल म्हणजेच 24 ऑक्टोबरला मॅच झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. आतापर्यंतच्या इतिहासात पाकिस्तान भारताला कधीही अशाप्रकारे हरवलं नव्हतं. पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. जे आजपर्यंत इतर कोणत्याही पाकिस्तानी कर्णधाराने केले नाही ते बाबर आझमने केले आहे. तसेच टी -20 आंतरराष्ट्रीय मध्ये भारताचा 10 गडी राखून पराभव करणारा पाकिस्तान पहिला संघ बनला आहे.
एवढं सगळं झाल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटलं असेल की, पाकिस्तानी खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला गेला असावा. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आलं असेल की, नक्की या खेळाडूंनी हा विजय साजरा तरी कसा केला असावा.
परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इतकं सगळं होऊन देखील पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील दृश्य काही वेगळीच होती.
पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधून समोर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ड्रेसिंग रूममध्ये पाक संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ सर्वजण उपस्थित होते. पण आपल्या मनात जो आनंद, जो उत्सव होता तो या खेळाडूंनी साजरा केला नाही. खरेतर विश्वचषकाच्या मंचावर प्रथमच भारताला पराभूत केल्यानंतर ते व्हायला हवे होते.
परंतु भारताचा पराभव केल्यानंतर हे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये पुढील प्लॅनिंग करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेटच्या ट्विटर हँडलने शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक संघाला संबोधित करताना आणि पुढील गेम प्लॅनबद्दल बोलताना दिसत आहे.
The captain and head coach address the players after Pakistan's historic win over India. #WeHaveWeWill pic.twitter.com/Laww5iTMzX
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 24, 2021
या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, प्रथम कर्णधार बाबर आझमने संघाला संबोधित केले. तो म्हणाले की, भारतावर विजय मिळवल्यानंतर आपण भारावून जाऊ नये. कारण, आपण एकच सामना जिंकला आहे. काम पूर्ण झाले नाही. आपल्याला संयम राखायचा आहे. तुम्ही मजा मसती करा परंतु तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. कारण आपलं लक्ष विश्वचषक जिंकण्यावर आहे.
कर्णधार बाबर आझमनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनीही संघाला दोन शब्दात सांगितले. त्यांनी प्रथम प्लेइंग इलेव्हन आणि भारताला पराभूत करणाऱ्या सपोर्ट स्टाफचे कौतुक केले. त्यानंतर ते म्हणाले की, जे झाले ते आता विसरायला हवे. आता जे उरले आहे त्याकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे. बाकीचे संघ समान विचारसरणीने आमच्या विरोधात नियोजन करतील आणि त्यासाठी आपण तयार असले पाहिजे.