मुंबई : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना बघू इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. आयसीसीने सोमवारी या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना गट 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. या दोघांसह या गटात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आणि आयर्लंडचे संघ आहेत.
पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळल्यानंतर टीम इंडिया आपला पुढचा सामना केपटाऊनमध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. यानंतर 18 फेब्रुवारीला त्यांचा सामना इंग्लंडशी होईल आणि हा सामना पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळवला जाईल, ज्याचे नाव बदलून अबाइखा करण्यात आले आहे. एका दिवसानंतर म्हणजेच 20 फेब्रुवारीला भारत आणि आयर्लंडचा सामना होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये होणार आहे. 10 फेब्रुवारीपासून विश्वचषकाला सुरुवात होत असून यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात केपटाऊनमध्येच पहिला सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश गट 1 मध्ये आहेत.
दोन्ही गटांचे संघ साखळी फेरीत सामने खेळतील आणि दोन्ही गटात अव्वल-2 मध्ये स्थान मिळविणाऱ्या दोन संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. पहिला उपांत्य सामना 23 फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे होणार आहे. 24 फेब्रुवारी हा राखीव दिवस आहे. पण दुसरा उपांत्य सामनाही त्याच दिवशी खेळवला जाईल. या सामन्यासाठी २५ फेब्रुवारी हा राखीव दिवस आहे. फायनल 26 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये होणार आहे. यासाठी 27 फेब्रुवारी हा राखीव दिवस आहे.
भारतीय महिला संघाने एकदाही एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला नाही. या संघाने दोनवेळा अंतिम फेरीत प्रवेश केला होता मात्र विजयापासून वंचित राहिले होते. 2005 मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता पण त्यांना विजय मिळवता आला नाही. यानंतर 2017 मध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक फायनल खेळली. पण इंग्लंडकडून पराभव झाला होता.