Tanya Hemanth : गेले काही महिने इराणमधील (Iran) महिलांनी हिजाबविरोधात (Hijab) तीव्र आंदोलन छेडले आहे. हिजाब घालण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी (mahsa amini) यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांना हिजाब परिधान करणे अनिवार्य असल्यामुळे देशभरातील महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. जगभरात या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता. मात्र आता इराणच्या या सक्तीचा अनुभव भारतीय बॅटमिंटनपटूला आला.
हिजाबविरोधात इराणच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. दुसरीकडे इराणमध्ये खेळवल्या गेलेल्या फजर इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन ( Iran Fajr International Challenge badminton tournament) स्पर्धेत घडलेल्या एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरुय. रविवारी भारताच्या तान्या हेमंतने (Tanya Hemanth) बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावले. मात्र यावेळी तान्याच्या विजयापेक्षा पुरस्कार सोहळ्यावेळी झालेल्या कृतीची चर्चा होत आहे. इराणमध्ये तान्या हेमंतला सुवर्णपदक मिळवण्यासाठी हिजाब घालावा लागला.
तान्या जिंकल्यानंतर ती सुवर्णपदक घेण्यासाठी जाणार होती, पण त्यावेळी इराणच्या अधिकाऱ्यांनी तिला स्कार्फ घालायला सांगितले. त्यानंतर तान्या हेमंतने स्कार्फ घातला आणि त्यानंतरच ती पदक गोळा घेण्यासाठी जाऊ शकली. प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीतून प्रशिक्षण घेतलेल्या 19 वर्षाच्या त्यान्याने 30 मिनिटे चाललेल्या सामन्यात तसनीम मीरचा पराभव केला. यानंतर पदक स्विकारण्यासाठी जात असताना तिला रोखण्यात आले. हिजाब घातल्यावरच पदक स्विकारता येईल असे सांगण्यात आल्यानंतर तान्याने हिजाब घातला आणि पदक स्विकारले.
मॅच खेळताना बंदी नाही मग पदक स्विकारताना का?
या स्पर्धेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डोक्यावर स्कार्फ किंवा हिजाब घालण्याबाबतचा कोणताही उल्लेख नव्हता. पण आयोजकांनी तान्याला स्टेजवर जाण्यापूर्वी डोक्याला स्कार्फ बांधायला सांगितले. त्यानंतरच तान्याला पदक स्विकारता आले. तसेच सामन्यादरम्यान कोणताही नियम नसतानाही पुरुष प्रेक्षकांनाही महिलांचे सामने पाहण्यावर बंदी घालण्यात आली होती. सामन्याच्या ठिकाणी पुरुष असलेल्या महिला खेळाडूंचे प्रशिक्षक आणि पालकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नाही असे पोस्टर्स लावण्यात आले होते.