मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्याची सीरिजला शुक्रवारी सुरुवात होणार आहे. त्यातला पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. ही कसोटी सीरिज जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझिलंड सामना होणार का? हे या कसोटी सीरिजनंतर ठरणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही सीरिज जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे.
भारत विरुद्ध इंग्लड पहिला सामना चेन्नईमधील चेपक स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सीरिजकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. या सीरिजनंतर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यासाठी पोहोचेल. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझिलंड पार पडणार आहे.
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझिलंड दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम सामन्यासाठी न्यूझिलंड संघ सज्ज आहे. मात्र त्यासोबत कोणता संघ खेळणार हे येत्या सीरिजमध्ये कोण बाजी मारणार यावर ठरणार आहे. इंग्लंडच्या संघाचा मैदानात धोबीपछाड करून संघ माघारी पाठवण्याचं भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे.
भारतीय वेळेनुसार शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सीरिजमधील पहिला सामना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. सकाळी 9 वाजता नाणेफेक होणार आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटच्या करियरमधील हा 100 वा कसोटी सामना आहे.
दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. तर भारतीय संघातील प्लेइंग इलेवनबाबत विचार करायचा झालाच तर भारतीय संघात एक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल पुन्हा एकदा सलामीच्या फलंदाजीमध्ये सामन्याची सुरुवात करताना पाहायला मिळू शकतात. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे त्यानंतर खेळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये चांगल्या फलंदाजीमुळे ऋषभ पंत 6व्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळू शकतो. चेन्नईतील मैदान पाहता स्पिनर्सची इथे भारतीय संघाला चांगली मदत होऊ शकते. इथे स्पिनरला संधी असल्यानं ऋद्धिमान साहालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन सुंदर, अश्विन त्यानंतर स्पिनरसाठी कुलदीप यादव देखील संघात खेळताना पाहायला मिळू शकतो. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहसोबत इशांत शर्मा खेळण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराजला देखील प्लेइंग इलेवनमध्ये करण्याबाबत कर्णधार विराट कोहोली विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.