गुवाहाटी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही शतक केलं आहे. रोहित शर्माचं हे वनडेमधलं २०वं शतक आहे. या शतकाबरोबरच रोहित शर्मा दिग्गजांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या १० सगळ्यात जुन्या देशांविरुद्ध शतक करण्याचा विक्रम रोहित शर्मानं केला आहे. हे रेकॉर्ड करणारा रोहित १०वा खेळाडू बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, हर्शल गिब्स, हशीम आमला, विराट कोहली, रॉस टेलर, एबी डिव्हिलियर्स, मार्टिन गुप्टील, उपुल थरंगा या खेळाडूंनी हा विक्रम केला होता.
एकाच वनडेमध्ये शतक करणाऱ्यांच्या यादीमध्ये विराट आणि रोहित दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. एबी डिव्हिलियर्स आणि हशीम आमलानं ५ वेळा, सचिन तेंडुलकर-सौरव गांगुलीनं ४ वेळा, हशीम आमला-क्विंटन डी कॉकनं ४ वेळा आणि रोहित शर्मा-विराटनं ४ वेळा एकाच मॅचमध्ये शतकं केली आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये २४६ रनची पार्टनरशीप झाली. वनडेमध्ये रनचा पाठलाग करताना ही दुसरी सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. रनचा पाठलाग करताना सर्वात मोठी पार्टनरशीप करण्याचं रेकॉर्ड रिकी पाँटिंग आणि शेन वॉटसनच्या नावावर आहे. २००९ साली सेंच्युरियनच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये वॉटसन आणि पाँटिंगमध्ये नाबाद २५२ रनची पार्टनरशीप झाली होती.
रनचा पाठलाग करताना झालेली ही भारतीय खेळाडूंची सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. याआधी श्रीलंकेविरुद्ध २००९ साली गौतम गंभीर-विराट कोहलीनं २२४ रनची, १९९७ साली श्रीलंकेविरुद्धच मोहम्मद अजहरुद्दीन-अजय जडेजाची २२३ रनची पार्टनरशीप झाली होती.