मुंबई : वेस्टइंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी भारतीय चाहत्यावर चांगलाच भडकला. डॅरेन सॅमीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाकिस्तानबद्दल कमेंट करणाऱ्या एका भारतीय चाहत्याला प्रतिक्रिया देताना डॅरेन सॅमीचा तोल ढासळला. माझ्या पेजवरून चालता हो, अशी प्रतिक्रिया डॅरेन सॅमीनं या चाहत्याला दिली. डॅरेन सॅमी हा पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) ची टीम पेशावर जल्मीच्या अधिकृत किट लॉन्च कार्यक्रमासाठी पाकिस्तानमध्ये गेला होता. पाकिस्तानी चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसाद आणि प्रेमाबद्दल भावूक होऊन सॅमीनं एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
३५ वर्षांच्या डॅरेन सॅमीचं पाकिस्तानमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. पाकिस्तानमधल्या सुरक्षारक्षक आणि यजमानांसोबतचा एक फोटो सॅमीनं इन्स्टाग्रामवर अपलोड केला. 'एकता अतूट शक्ती, प्रेमानंच संसार चालतो. पाकिस्तानी नागरिकांसाठी प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही', असं कॅप्शन सॅमीनं या फोटोला दिलं. यानंतर डॅरेन सॅमीवर भारतीय यूजर्सनी निशाणा साधला.
एका भारतीय यूजरनं 'ते दहशतवादी आहेत', अशी प्रतिक्रिया सॅमीच्या फोटोवर दिली. ही प्रतिक्रिया पाहून सॅमी भडकला आणि त्याला 'माझ्या पेजवरून चालता हो' असं म्हणाला.
डॅरेन सॅमी हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जल्मी या टीमचं नेतृत्व करतो. पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं पुनरागमन व्हावं, यासाठी डॅरेन सॅमी सक्रिय आहे. २००९ साली पाकिस्तानच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगातल्या बहुतेक खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला. पाकिस्तान सुपर लीगचा चौथा हंगाम १४ फेब्रुवारीपासून सुरु होईल. ३० मॅचची ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाईल, तर शेवटच्या चार मॅचचं पाकिस्तानमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.