सिडनी : भारताने ४ कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या खिशात घातली. सिडनीत झालेल्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टळला आणि सामना अनिर्णित राहिला. जर हा सामना भारताने जिंकला असता तर ऑस्ट्रेलियाला ३-१ च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला असता. पण पावसामुळे सर्व समीकरणे फिसकटली. कसोटी मालिकेनंतर आता यजमान ऑस्ट्रेलियासोबत ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला शनिवारी १२ तारखेपासून सुरुवात होणार आहे. हा पहिला सामना सिडनीत होणार आहे. पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने भारतीय संघाला मैदानावर सराव न करता इनडोअर सराव करावा लागला. या इनडोअर सरावाचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.
When it's raining outdoors, we switch to indoors #AUSvIND pic.twitter.com/pkWBcyygtM
— BCCI (@BCCI) January 10, 2019
पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने हा सामना होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी धोनी, रोहित शर्मा, अंबाती रायडू सिडनीत दाखल झाले आहेत. या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात दाखल होताच संघातील इतर खेळांडूसोबत सराव केला. पण गुरुवारी सिडनीत पाऊस झाल्याने संघाला इनडोअर सराव करावा लागला. सिडनीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट असल्याने खेळामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. समुद्रापासून सिडनी शहर जवळ असल्याने येथे केव्हाही पावसाळा सुरु होतो.
एकूणच पाहता या संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पावासाचेच वर्चस्व राहिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ३ टी-२० सामन्यांनी झाली. यातील मेलबर्न येथे खेळला जाणारा दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही. तसेच सिडनीतील अखेरचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. तर एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे.