कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी २१ सप्टेंबरला दुसरा वनडे सामना होणार आहे. मात्र, या सामन्यात पावसाचा अडथळा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इथे सायंकाळी पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता ईडन गार्डन्स मैदान पूर्णपणे कव्हरने झाकण्यात आलं आहे.
चेन्नईमध्ये रविवारी झालेल्या सामन्यावेळीही पावसाने हजेरी लावली होती. मात्र, हा पाऊस जास्त वेळ नव्हता. कोलकातामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊसाची संततधार सुरू आहे. भारताने चेन्नई येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे पुढील सामन्यावरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोलकाता हवामान खात्याचे निर्देशक गणेश दास म्हणाले की, ‘सप्टेंबर महिन्यात पाऊस येण्याची शक्यता अधिक असते. असेही होईल की, पाऊस जास्त वेळ थांबणार नाही’.