नवी दिल्ली : कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली. मात्र, या टेस्ट मॅचमध्ये फास्ट बॉलर्सने एक एक खास रेकॉर्ड केला आहे.
भारतीय क्रिकेट मैदानात खासकरुन टेस्ट मॅचेसमध्ये स्पिनर्सची धूम पहायला मिळते. भारतीय पिचवर स्पिनर्स अशी बॉलिंग करतात की विरोधी टीमच्या बॅट्समनला घाम फोडतात.
भारतीय पिचवर स्पिनर्सने केलेल्या पराक्रमांचा एक वेगळाच इतिहास आहे. स्पिनर्स व्यतिरिक्त इतर कुठल्याच बॉलरची चालत नाही. मात्र, कोलकातामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या मॅचमध्ये वेगळाच प्रकार झाल्याचं पहायला मिळालं.
भारत-श्रीलंकेत झालेल्या टेस्ट मॅचमध्ये स्पिनर्सने एकही विकेट घेतला नाही. होय, या मॅचमध्ये भारताकडून केवळ फास्ट बॉलर्सनेच विकेट्स घेतले. या मॅचमध्ये दोन्ही स्पिनर्स खाली हात पेवेलियनमध्ये परतले.
आकड्यांचा विचार केला तर टीम इंडियाने आतापर्यंत एकूण ५१६ मॅचेस खेळल्या आहेत. त्यापैकी २६२ मॅचेसनंतर असं पहिल्यांदा झालं आहे की, टीम इंडियाच्या एकाही स्पिनरने घरच्या मैदानात विकेट घेता आला नाही.
भारत-श्रीलंका यांच्यात झालेल्या टेस्ट मॅचमधील दोन्ही इनिंग्समिळून टीम इंडियाच्या बॉलर्सने एकूण १७ विकेट्स घेतले. हे सर्वच्या सर्व विकेट्स फास्ट बॉलर्सने घेतले. १७ विकेट्सपैकी ८ विकेट्स भुवनेश्वर कुमारने केले. ६ विकेट्स मोहम्मद शमीने घेतले तर, ३ विकेट्स उमेश यादवने घेतले.
त्यामुळे रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाने या मॅचमध्ये एकही विकेट घेता आला नाही.
असं नाहीये की या मॅचमध्ये एकाही स्पिनरला विकेट घेता आला नाही. कारण, श्रीलंकेच्या बॉलर्सने या मॅचमध्ये एकूण १८ विकेट्स घेतले. यापैकी तीन विकेट्स दिलरुवन परेराने घेतले.