मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमामध्ये अनेक युवा खेळा़डू स्वत:ची प्रतिभा दाखवताना दिसत आहेत. राजस्थानचा रियान पराग हादेखील आयपीएल गाजवतोय. रियान परागचे वडिल पराग दास यांना २० वर्षांपूर्वी एमएस धोनीने एका प्रथम श्रेणी मॅचमध्ये स्टम्पिंग केलं होतं. ३ वर्षांचा असताना रियान परागने धोनीसोबत एक फोटो काढला होता. आता रियान पराग त्याच्याविरुद्ध मैदानात खेळत आहे. हा माझ्यासाठी सन्मान असल्याचं रियान परागने सांगितलं.
रियानने चेन्नईविरुद्धच्या मॅचमधून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. या मॅचमध्ये रियानने १६ रन केले, अखेर धोनीने कॅच पकडून रियान परागला माघारी धाडलं. धोनीने १९९९-२००० साली बिहारकडून रणजी क्रिकेटमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. धोनीने इस्ट झोन लिगमध्ये आसामविरुद्ध खेळताना रियान परागचे वडिल पराग दास यांना स्टम्पिंग केलं होतं.
या योगायोगाबद्दल बोलताना आणि धोनीसोबत मैदानात असल्याचा अनुभव सांगताना रियान पराग म्हणाला, 'धोनीसमोर खेळतानाचा अनुभव खूप चांगला होता. त्याने पहिले माझ्या वडिलांना स्टम्पिंग केलं आणि आता माझा कॅच पकडला. धोनी हा महान खेळाडू आहे. त्याच्यासोबत मैदानात असणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यामुळे मी खुश आहे.'
आसाममध्ये राहणारा रियान पराग तिथूनच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. आसाममधून क्रिकेट खेळणं कठीण होतं, पण तिथल्या क्रिकेट संघाने माझी मदत केल्याचं रियानने सांगितलं. 'आसाममध्ये आता चांगल्या सुविधा मिळत आहेत. पण ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत, त्याची मी तक्रार करू शकत नाही. आसाम क्रिकेट संघाने बरीच मदत केली, कारण तिकडे बहुतेक वेळा पाऊस पडत असतो. तिकडे मला इनडोर स्टेडियम देण्यात आलं. इंडो एस्ट्रो टर्फ मिळालं. तिकडे मी बराच अभ्यास केला,' अशी प्रतिक्रिया रियान परागने दिली.
रियान परागला राजस्थानने लिलावात २० लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. माझे वडिल पराग दास हेच माझे आदर्श असल्याचं रियान पराग सांगतो. मी आत्तापर्यंत जे मिळवलं आहे, त्यामध्ये वडिलांचं योगदान सर्वाधिक आहे. त्यांच्यामुळेच आपण क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आज मी जो काही आहे, तो वडिलांमुळेच आहे, असं वक्तव्य त्याने केलं.
रियान परागने मुंबई आणि कोलकात्याविरुद्धच्या विजयामध्ये मोलाची भूमिका निभावली होती. आयपीएल खेळणं मोठी गोष्ट आहे, यामुळे आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये खेळण्याचं माझं स्वप्न साकार करण्यासाठी मी याचा वापर करु शकतो, असं रियान पराग म्हणाला.