मुंबई : आयपीएलचा 15 वा सिझन सुरु झाला असून यावेळीही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स टीममधील काही खेळाडू आणि सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. यामुळे आता बुधवारी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. शिवाय यंदाची आयपीएल रद्द करण्याची मागणी केली जातेय.
आयपीएलमध्ये कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर सोशल मीडियावर Cancel IPL असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. यामध्ये चाहते लागोपाठ या हॅशटॅगवरून ट्विटवर पोस्ट करत आहेत. यावेळी काहींनी चिंता व्यक्त करत यंदाची आयपीएल रद्द होणार का असा सवाल सोशल मीडियावर केला आहे.
दरम्यान यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे चाहते मात्र या सगळ्याचा आनंद घेताना दिसतायत. कारण या दोन्ही टीम्सचा परफॉरमन्स या सिझनमध्ये फारच वाईट आहे. चेन्नईला केवल 1 सामना जिंकता आला असून मुंबईची टीम अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
दर सिझनला टॉपला असलेली मुंबई इंडियन्स यंदा तळाला आहे. तर दोन नवीन टीन्स गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स यांची कामगिरी उत्तम झाली आहे. त्यामुळे Cancel IPL च्या ट्रेंडमध्ये या दोन्ही टीमचे चाहते विरोध दर्शवतायत.
गेल्या आयपीएलच्या सिझनमध्ये 29 सामन्यांनंतर कोरोनाची एन्ट्री झाली होती. यानंतर आयपीएलची टूर्नामेंट 4 मे रोजी मध्येच स्थगित करण्यात आली. यानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दुबईमध्ये खेळवण्यात आला. यावेळीही 17 एप्रिलपर्यंत 29 सामने झाले असून पुन्हा एकदा आयपीएलमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत.