IPL 2023 DC vs LSG: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरोधात झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिगने (Delhi Capitals chief coach Ricky Pointing) नाराजी जाहीर केली आहे. संघाचं वाईट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी यामुळे दिल्ली संघाचा 50 धावांनी पराभव झाल्याने रिकी पाँटिगने संघाला खडे बोल सुनावले आहेत. दिल्लीच्या गोलंदाजांना एकूण 16 षटकार लगावण्यात आले. याशिवाय लखनऊचा ओपनर काइल मेयर्सचा झेल सोडला.
काइल मेयर्सने 38 चेंडूत 73 धावा ठोकत तुफान फलंदाजी केली. आपल्या खेळीत त्याने सात षटकार लगावले. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 193 धावासंख्या उभारली होती. पण दिल्ली संघ फक्त 143 धावा करु शकला. रिकी पॉटिंगने सामन्यानंतर बोलताना, गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे लखनऊ अपेक्षेपेक्षा जास्त धावा करु शकला असं सांगितलं.
"खरं सांगायचं तर मला वाटतं लखनऊने आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या चार षटकांनंतर आमचं क्षेत्ररक्षण फार चांगलं नव्हतं. काही झेल आम्ही सोडले," असं रिकी पाँटिगने सांगितलं. मेयर्सचा झेल ही आमच्याकडे फार मोठी संधी होती. तो झेल सोडल्यानंतर त्याने चांगली फलंदाजी केली, ज्यामुळे आम्ही मागे पडलो असं रिकी पाँटिंग म्हणाला.
"आयपीएलमध्ये तुम्ही चांगल्या खेळाडूंना दुसरी संधी देऊ शकत नाही. मेयर्सने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याने सर्व चेंडूंवर फटकेबाजी केली. फिरकी गोलंदाजांवर तो तुटून पडला होता," असं रिकी पाँटिंग म्हणाला.
"आमच्यासाठी हा चांगला धडा आहे. आम्ही क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी करणं अपेक्षित आहे. आम्ही अशाप्रकारे संधी गमावू शकत नाही. जर संधी सोडली तर विरोधक तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल," असं रिकी पाँटिगने सांगितलं.
"आम्ही एकूण 16 षटकार लगावण्याची संधी दिली. याचा अर्थ आम्ही फार चांगली गोलंदाजी केली नाही. मला वाटतं जेव्हा तुम्ही 16 षटकार आणि चार ते पाच चौकार मारता तेव्हा चित्र स्पष्ट असतं. तुम्ही अशावेळी पुन्हा खेळात पुनरागमन करु शकत नाही," असं मत रिकी पाँटिगने व्यक्त केलं.
"विकेट पाहता तिथे 190 धावा होणं शक्य नव्हतं. मैदानावर ड्यू होतं. नंतर फलंदाजी करणं आमच्यासाठी फायद्याचं होतं. आमचा पराभव का झाला यासाठी काही कारणं असून, आम्ही त्यावर काम करु," असं रिकी पाँटिंग म्हणाले.
"वूडने चांगली गोलंदाजी केली. त्याने आम्हाला अपेक्षित होती तशीच गोलंदाजी केली. त्याने बाऊन्सर्सचा चांगला वापर केला. तो एक वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे. जसजशी स्पर्धा पुढे जाईल आणि तो फिट राहिला तर अजून चांगली गोलंदाजी पाहण्यास मिळेल," अशी आशा त्याने व्यक्त केली.