KL Rahul : भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार असलेला केएल राहुल दुखापतीमुळे या स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. नुकतीच त्याच्यावर परदेशात शस्त्रक्रिया देखील झाली आहे. या दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलच्या स्पर्धेतही केएल राहुलला खेळण्याची संधी मिळणार नाहीये. त्यामुळे त्याच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिलाय. अशातच त्याने एका पॉडकास्टमध्ये बोलताना युवा खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाबाबत भाष्य केले आहे.
एक मोठा करार तरुण क्रिकेटपटूंना विचलित करु शकतो. युवा क्रिकेटपटूंना महागडे किंवा जास्त पगाराचे करार मिळाल्यावर त्यांच्या कारकिर्दीपासून लक्ष विचलित होऊ शकते, असे केएल राहुलचे मत आहे. राहुलने ‘द रणवीर शो’ मध्ये त्याने आपल्या आयुष्यातील अनेक घटनांवर मनमोकळेपणाने भाष्य करताना यावर आपले मत मांडले आहे.
"आयपीएल किंवा कुठलीही लीग त्यात मोठा आणि फायदेशीर करार युवा क्रिकेटपटूंची दिशाभूल करू शकतो. तसेच त्यांना जर सुरुवातीच्या टप्प्यावर जास्त पैसे मिळाले तर त्यांचे करिअरपासून लक्ष विचलित होऊ शकते. कोणत्याही चांगल्या मार्गदर्शनाशिवाय खूप लवकर पैसे मिळवणे हे नवोदित खेळाडूचे लक्ष्य विचलीत करु शकते. मला पटकन खूप पैसे मिळाले नाहीत. माझ्या कारकिर्दीत सर्व काही टप्प्याटप्प्याने घडले आहे. मी संथपणे सुरुवात केली आणि मूलभूत करार मिळवण्यासाठी अनेक वर्षे क्रिकेट खेळलो," असे केएल राहुलने म्हटले आहे.
माझा पहिला चेक पाहून मनाचा तोल गेला होता - केएल राहुल
"मला माझा पहिला मोठे कॉन्ट्रॅक्ट 2018 मध्ये मिळाले, जेव्हा मी कदाचित 25 किंवा 26 वर्षांचा होतो. तेव्हापासून माझ्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहेत आणि ते तुम्हाला खूप काही शिकवतात. यामुळे तुमचे मन नेहमीपेक्षा अधिक संतुलित होते. सुरुवातीला माझा पहिला चेक पाहून मनाला तोल गेला होता, पण मला ते पटकन कळलं आणि मी शांत झालो," असेही राहुल म्हणाला.
"तुम्ही जगासमोर मोठे व्हा आणि पुढे जा. तुमचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती आणि तुमच्या तोंडातून निघालेल्या प्रत्येक शब्दाला न्याय मिळतो आणि त्यामुळे तुम्ही नेहमी दडपणाखाली असता. तुम्हाला ते जाणवते. हे तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही. किमान क्रिकेटच्या जगात तुम्ही भाग्यवान असाल आणि तुमच्याकडे एक मार्गदर्शक असेल तर तो तुम्हाला तरुण वयात योग्य मार्ग दाखवू शकेल. तो तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तयार करतो," असे केएल राहुल म्हणाला.