IPL 2024 Navjyot Singh Sidhu On राजकारणामध्ये नशीब आजमावल्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा क्रिकेटकडे वळले आहेत. समालोचनामधील आपली सेकेण्ड इनिंग सिद्धू यंदाच्या आयपीएलपासून सुरु करणार आहेत. आपण आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये परतणार आहोत असं सिद्धू यांनी जाहीर केलं आहे. ही घोषणा करण्याबरोबरच सिद्धू यांनी मुंबई इंडियन्सच्या संघासंदर्भात एक स्फोटक विधान केलं आहे. नवीन कर्णधार हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार रोहित शर्माचा उल्लेख करत सिद्धू यांनी हे विधान केलं आहे. बदल हा सृष्टीचा नियम असल्याचं सांगताना रोहित शर्माने आता पुढील आयपीएलमधील वाटचालीचाही मनसोक्तपणे आनंद घेतला पाहिजे, असं सिद्धू यांनी म्हटलं आहे.
कर्णधारपद गमावल्याचा खेद रोहितला वाटता कामा नये, असं सिद्धू यांनी म्हटलं आहे. रोहित शर्मानेच ज्या खेळाडूचं करिअर घडवलं आहे त्याच्याकडेच कर्णधारपद गेल्याने त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नसल्याचंही सिद्धू यांनी म्हटलं आहे. रोहित शर्मानेच हार्दिक पंड्याला मुंबईच्या संघातून संधी दिली. त्यानंतर येथील कामगिरीच्या जोरावर हार्दिकने टीम इंडियामध्ये प्रेवश मिळवला.
सिद्धू यांनी रोहित शर्माने अनेक वर्ष मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व केलं आहे, असं सांगताना यामधूनच त्याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्वही सोपवण्याचं आल्याचं म्हटलं. "कर्णधारपद गेल्यानंतर आता त्याने आयपीएलचा आनंद घेतला पाहिजे. फार ताण न घेता मोकळेपणे फलंदाजी केली पाहिजे. अनेकांना कर्णधारपद संभाळणं हे टेन्शनचं काम वाटतं. मात्र आता रोहितने हे टेन्शन विसरुन खेळाचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे," असं सिद्धू म्हणाले. तसेच रोहित शर्माचा अनुभव हा हार्दिक पंड्याला आवश्यक असेल आणि तो अनेकदा मैदानात रोहितचा शर्मा घेताना दिसेल असा विश्वास सिद्धू यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> 'मला फार चिंता करण्याची गरज नाही कारण...'; CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया
"तुम्ही कर्णधार नसता तेव्हा तुमच्यावर अधिक दबाव नसतो. कोणत्याही कर्णधाराचा किंवा नेतृत्व करणाऱ्याला काटेरी वाटेवर चालावं लागतं. तुम्हाला हे पटो अथवा नाही, मात्र हेच सत्य आहे. कोणातरीसाठी कर्णधारपद हे कामगिरी सुधारण्यासारखं असतं तर काहींसाठी ती शिक्षा ठरते," असं सिद्धू म्हणाले. "राहिला प्रश्न हार्दिक पंड्याचा तर तो सामन्याच्या दरम्यान अनेकदा पळत रोहितकडेच येईल यात शंका नाही," असंही सिद्धू 'इंडिया टूडे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. मला विश्वास आहे की हार्दिक पंड्या सतत रोहित शर्माकडे धावत जाईल आणि त्याच्याकडून कर्णधारपदासंदर्भातील सल्ले घेताना दिसेल, असंही सिद्धू यांनी मुलाखतीमध्ये दुसऱ्यांदाही नमूद केलं.
नक्की वाचा >> धोनीने CSK चं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितची Insta स्टोरी चर्चेत; पोस्ट पाहून चाहते भावूक
"असा एक वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तेव्हा त्याला एखादं पद सोडावं लागतं. अगदी इयन चॅपल असो किंवा ग्रेग चॅपल असो किंवा अगदी तेंडुलकर असो वेळ आला की प्रत्येकाला जावं लागतं. रोहितकडे अजूनही बराच वेळ आहे. त्याने तब्बेतीकडे लक्ष दिलं तर तो फार उत्तमपद्धतीने दिर्घकाळ खेळू शकतो. तो फ्रंट फूटवर उत्तम षटकार लगावतो," असं सिद्धू यांनी सांगितलं.