No Rohit Sharma Hardik Pandya In Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचं म्हणजेच 2024 चं आयपीएलचं पर्व फारच निराशा करणारं ठरलं. मुंबईचा संघ यंदाच्या पर्वातील साखळी सामन्यांनंतर पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी असलेला संघ ठरला आहे. या पर्वानंतर आता मुंबईचा संघ माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विद्यमान कर्णधार हार्दिक पंड्या दोघांनाही करारमुक्त करु शकतो अशी दाट शक्यता भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने व्यक्त केली आहे. यंदाच्या वर्षीच आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन म्हणजेच महा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये आयपीएलच्या संघांना त्यांच्या आवडीचे खेळाडू कायम ठेवत बाकीच्यांना करारमुक्त करण्याची संधी आहे. त्यामुळेच पुढील वर्षी मुंबई इंडियन्सचा संघामध्ये रोहित शर्माही नसेल आणि हार्दिक पंड्याने नसेल अशी शक्यता सेहवागने व्यक्त केली असून दोघांच्या सुमार कामगिरीमुळे त्यांना डच्चू दिला जाईल असं त्याने म्हटलं आहे.
हार्दिक पंड्या यंदाच्या पर्वामध्ये मुंबईचा कर्णधार झाल्यानंतर नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. पंड्याला या पर्वात ना गोलंदाजी नीट करता आली ना फलंदाजी. पंड्याने सर्व सामन्यांमध्ये मिळून 200 धावा केल्या आणि 11 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे रोहित शर्मानेही यंदाच्या पर्वाला सुरुवात उत्तम केली. त्याने एक शतकही झळकावलं. मात्र त्यानंतर रोहितची कामगिरी खालावत गेली. रोहितची कामगिरी एवढी सुमार झाली की टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी रोहितच्या कामगिरीसंदर्भात निवड समितीने चर्चाही केली. या साऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरच विरेंद्र सेहवागने मुंबईचा संघ रोहित आणि हार्दिकलाही करारमुक्त करुन दोनच खेळाडूंना कायम ठेवेल, असं म्हटलं आहे. कायम राहणारे खेळाडू कोणते असतील हे सुद्धा सेहवागने सांगितलं आहे.
"शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान हे सारे एकाच चित्रपटात असतील तर तो चित्रपट यशस्वी होईल याची गॅरंटी देता येत नाही. येते का? तुम्हाला कामगिरी करुन दाखवावी लागेल. बरोबर ना? तुमच्याकडे उत्तम स्क्रीप्ट हवी. त्याच पद्धतीने या मोठ्या नावांनी एकत्र याययला हवं आणि मैदानात कामगिरी करु दाखवायला हवी. रोहितने एक शतक झळकावलं आणि त्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला होता. बाकी त्याने कुठे उत्तम खेळी केली?" असा सवाल सेहवागने 'क्रिकबझ'शी बोलताना केला.
"इशान किशन संपूर्ण पर्व खेळला पण तो कधीच पॉवरप्लेच्या ओव्हर संपेपर्यंत मैदानावर टीकला नाही. सध्याची स्थिती पाहिल्यास केवळ दोन खेळाडूंना मुंबई इंडियन्सच्या संघाचं व्यवस्थापन (टीम मॅनेजमेंट) कायम ठेवेल असे खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे दोघेच आहेत. रिटेनर खेळाडूंच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह आणि सुर्यकुमार यादव हे दोघेच असतील. ही यादी वाढली आणि तिसरा तसेच चौथा खेळाडू रिटेन करणार असतील तर इतरांचा विचार केला जाईल," असं सेहवाग म्हणाला.