Can MI Qualify For Playoffs After Losing To LSG: इंडियन प्रमिअर लिग 2023 च्या (IPL 2023) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्लेऑफचे (Playoffs) सामने अगदी काही दिवसांवर आलेले असतानाची प्लेऑफच्या 3 जागांसाठी 6 संघांमध्ये स्पर्धा कायम आहे. 63 सामन्यानंतर गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या एकमेव संघाला प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यात यश आलं आहे. टॉप-2 संघांमध्ये गुजरातचं स्थान जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे क्वालिफायर-1 बरोबरच गुजरात अंतिम सामन्यात खेळेल असंही म्हटलं जात आहे. मात्र दुसरीकडे मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभूत झाल्याने मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघासमोरील अडचणी अधिक वाढल्याचं चित्र दिसत आहे. विजयाच्या फार जवळ येऊनही मुंबईच्या हाती पराभवच लागला. मोहसीन खानने मुंबईच्या तोंडचा विजयाचा घास तर पळवलाच मात्र त्याचबरोबर क्वालिफायर-1 मध्ये खेळण्याचं मुंबई स्वप्नही भंग पावलं आहे. मुंबईची प्लेऑफची पुढील वाट अधिक बिकट झाली आहे.
आता काहीही झालं तरी मुंबईला टॉप-2 मध्ये स्थान मिळवता येणार नाही. मुंबईला क्वालिफायर-1 ऐवजी क्वालिफायर-2 खेळावी लागणार आहे. इतकच काय तर अव्वल 4 मध्ये राहण्यासाठीही मुंबईला आता जास्त हातपाय मारावे लागणार आहेत. मुंबईला प्लेऑफ्समध्ये जागा बनवण्यासाठी फारच धडपड करावी लागणार असून ही वाटही फारच काटेरी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. विशेष म्हणजे ज्या लखनऊने मुंबईला पराभूत केलं आहे त्या लखनऊच्या संघाला रोहितच्या नेतृत्वाखालील संघ कधीच पराभूत करु शकलेला नाही. मुंबई आणि लखनऊदरम्यानच्या तिन्ही सामन्यांमध्ये लखनऊनेच विजय मिळवला आहे.
मुंबईला प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. मुंबईचा शेवटचा सामना सनराइजर्स हैदराबादविरुद्ध खेळवला जाणार आहे. मात्र केवळ सामना जिंकून मुंबईचं स्थान निश्चित होणार नाही. या सामन्यात मुंबईने मोठा विजय मिळवला तरच त्यांचं नेट रन रेट अधिक चांगलं होईल. लखनऊविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबईचा नेट रन रेट वजा 0.128 इतका आहे. तर प्लेऑफमधील जागेसाठी स्पर्धा असलेल्या लखनऊन, चेन्नई आणि बंगळुरुचा नेट रनरेट हा सकारात्मक आहे. प्लेऑफच्या शर्यतीमध्ये पंजाबही दावेदार मानला जात आहे. मात्र मुंबईप्रमाणेच त्यांचाही नेट रन रेट निगेटीव्ह आहे. आपल्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून नेट रन रेट सुधारुन प्लेऑफमध्ये पोहचण्याचे पंजाबचे प्रयत्न असतील.
रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाला स्वत:च्या विजयाबरोबरच इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहवं लागणार आहे. आरसीबी, चेन्नई आणि लखनऊ या तिन्ही संघांपैकी एक संघाचा त्यांच्या पुढील सामन्यात पराभव झाल्यास मुंबईला फायदा होईल. याचबरोबर मुंबईला आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून नेट रन रेट पॉझिटीव्हमध्ये जाईल याची काळजी घेणं आवश्यक आहे.
सध्या गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाला आहे. तर दिल्ली आणि हैदराबादचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेमधून बाहेर पडले आहेत.