IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?

IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 31, 2024, 12:02 PM IST
IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय? title=
विराटसंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता

IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीवर इंडियन प्रिमिअर लीगमध्ये मोठी जबाबदारी सोपवण्याची तयारी त्याच्या रॉयल चॅलेंर्स बंगळुरुच्या संघाने केली आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासूनच एकाच संघासाठी खेळणारा खेळाडू अशी ओळख असलेल्या विराटकडे आरसीबीचा संघ नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा सोपवू शकतो. विराटने 2013 ते 2021 दरम्यान संघाचे नेतृत्व केलं आहे. आता 2025 च्या आयपीएलच्या पर्वात पुन्हा कर्णधारपद विराटकडे येऊ शकते अशी दाट शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिर्घकालीन नियोजन

आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाकडून सध्याचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसला रिजील करण्याची दाट शक्यता आहे. त्याने 2022 ते 2024 दरम्यान संघाचं नेतृत्व केलं आहे. संघ व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेमध्ये विराटनेच पुन्हा नेतृत्व संभाळायला आवडेल असं कळवल्याने त्याचा कर्णधारपदासाठी विचार केला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. फाफ ड्यु प्लेसिसने मागील तीन पर्वांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. ड्यु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली तीन पर्वांपैकी दोन पर्वांमध्ये आरसीबीचा संघ प्ले ऑफपर्यंत गेला होता. मात्र फाफ ड्यु प्लेसिस 40 वर्षांचा झाला आहे. अर्थात तो पुढील काही वर्ष खेळू शकतो मात्र संघ व्यवस्थापनाकडून दिर्घकाळ नियोजनाचा भाग म्हणून विराटकडे नेतृत्व सोपलं जाण्याची शक्यता आहे.

केलेलं भावूक विधान

फाफ ड्यु प्लेसिसच्या वयाची चर्चा होत असताना विराटकडे कर्णधारपदासंदर्भात विचारणा केली असता त्याने होकार दर्शवला. 2021 मध्ये संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देताना विराट फारच भावूक झाला होता. त्यावेळेस त्याने, "जोपर्यंत मी आयपीएलमध्ये माझा शेवटचा सामना खेळत नाही तोपर्यंत मी याच संघाकडून खेळत राहीन," असा शब्द चाहत्यांना दिला होता. 

विराटचा रेकॉर्ड कसा?

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरुच्या संघाने आयपीएलमध्ये 143 सामने खेळले आहेत. त्यापैकी संघाने 60 सामने जिंकलेत तर 70 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. विराट आतापर्यंत आयपीएलचे एकूण 252 सामने खेळला असून 38.66 च्या सरासरीने त्याने 8 हजार 4 धावा केल्या आहेत. 

तो दुष्काळ संपणार?

आयपीएलमध्ये आरसीबीला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. आता तीन वर्षांच्या गॅपनंतर विराट पुन्हा कर्णधारपद स्वीकारत असल्याने त्याच्या नेतृत्वाखाली संघ हा दुष्काळ संपवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे विराटने अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या माध्यमातूनच या छोट्या फॉरमॅटमध्ये खेळताना चाहत्यांना पाहता येणार आहे.