नवी दिल्ली : भारतीय टीम गुरुवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यामध्ये भारत ३ टी-२०, ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. २१ नोव्हेंबरपासून टी-२० सीरिज तर ६ डिसेंबरपासून टेस्ट सीरिज सुरु होईल. भारताच्या टेस्ट टीममध्ये ईशांत शर्माची निवड झाली आहे. ईशांत शर्माचा हा चौथा ऑस्ट्रेलिया दौरा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा एवढा अनुभव असलेला ईशांत हा सध्याच्या भारतीय टीममधला एकमेव बॉलर आहे. यावेळचा ऑस्ट्रेलिया दौरा माझा शेवटचा असू शकतो, त्यामुळे मी जीव तोडून खेळणार असल्याची प्रतिक्रिया ईशांत शर्मानं दिली.
मी आता ३० वर्षांचा आहे. २०२२-२३ सालच्या दौऱ्यात मी भारतीय टीमचा हिस्सा असेन का नाही हे मला माहिती नाही. तेव्हा मी ३४ वर्षांचा होईन. त्यामुळे आताच्या दौऱ्यात मी सर्वस्व पणाला लावणार असल्याचं वक्तव्य ईशांतनं केलं.
सध्याच्या भारतीय टीममध्ये ईशांत शर्मा सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे. ईशांत शर्मा ८७ टेस्ट मॅच खेळला आहे. ईशांत २००७-०८, २०११-१२ आणि २०१४-१५ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ईशांत शर्मानं १८ विकेट घेतल्या होत्या. भारताकडून ८७ टेस्ट खेळणाऱ्या ईशांतनं २५६ विकेट घेतल्या आहेत.
टेस्ट क्रिकेटमध्ये ईशांतला कर्णधार विराट कोहलीपेक्षा जास्त अनुभव आहे. विराटनं ७३ मॅच खेळल्या आहेत. सध्या भारतीय टीममधल्या युवा फास्ट बॉलरचा सल्लागार म्हणूनही ईशांत शर्मा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही दौऱ्यांमध्ये भारतीय फास्ट बॉलरची परदेशातली कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे.
२०१३ साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा विजय झाला. या स्पर्धेमध्ये ईशांत शर्मा विजयाचा हिरो होता. पण यानंतर ईशांत शर्मा भारतीय टीममधून बाहेर फेकला गेला. ईशांत शर्मानं भारताकडून ८० वनडे खेळला आहे. वनडे टीमचा हिस्सा नसल्याचं दु:ख होत असल्याचं ईशांत म्हणाला.
बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. स्मिथ-वॉर्नर अनुपस्थित असल्याचा फायदा भारताला नक्की होईल, असं ईशांतला वाटतंय.
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार