ICC ODI World Cup 2023, Kane Williamson: आयपीएल 2023 च्या (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात केन विलियम्सनने (Kane Williamson) बॉन्ड्री लाईनवर अफलातून मारूती उडी घेतली. मात्र, त्यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आयपीएलच्या सुरूवातीलाच केन संघातून बाहेर पडला. त्यानंतर आता आयपीएलमधील दुखापतीचा परिणाम न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) संघावर होण्याची शक्यता आहे. केन विलियम्सन आता विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची त्याची शक्यता कमी आहे. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
न्यूझीलंड संघाच्या व्यवस्थापनाने केन विल्यमसनला फिटनेस सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. विल्यमसन दोन आठवड्यांत तंदुरुस्त नसेल तर तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. 5 सप्टेंबर ही आयसीसीकडून संघाची घोषणा करण्याची शेवटची वेळ आहे. त्यामुळे प्राथमिक संघात केनचं नाव सामील होण्याची शक्यता फार कमी आहे. स्वत: केनने देखील याबाबत निराशा व्यक्त केली होती. दुखापत बरी होण्यास किती वेळ लागेल किंवा मी कोणत्या दिवशी परत येईन या क्षणी फक्त अंदाज लावू शकतो, त्याबाबत निश्चित माहिती देऊ शकत नाही, असं केन म्हणाला होता. त्यावर आता न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी माहिती दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी केन विल्यमसनच्या दुखापतीबद्दल आणि त्याच्या कमबॅक विषयी एक मोठी अपडेट दिली. 'तो पूर्ण पुनर्वसन मोडमध्ये आहे. त्याने नेटवर पुन्हा फलंदाजीही सुरू केली आहे आणि त्याला पुन्हा मेहनत करताना पाहून खूप आनंद झालाय. तो खूप वेगाने सुधार करत आहे, पण त्याला अजून स्वतःवर खूप काम करायचंय, जेणेकरून तो आपल्या सर्वांना जिथं पाहिजे, तिथं पोहचू शकतो, असं गॅरी स्टीड यांनी म्हटलं आहे.
The latest on Kane Williamson's fitness as #CWC23 edges closer
➡ https://t.co/ZP4Okj0OiL pic.twitter.com/k0u8KiJ1a7
— ICC (@ICC) August 28, 2023
दरम्यान, केन विलियम्सन हा वर्ल्ड कप संघात सामील होणार की नाही? यावर कोचने थेट उत्तर देण्याचं टाळल्याचं दिसून आलं. तो लवकर सर्वांना जिथं पाहिजे, तिथं पोहचू शकतो, असं म्हणत त्यांनी वर्ल्ड कपबाबत इशारा दिलाय का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जरी केन वर्ल्ड कप संघात खेळणार नसला तरी देखील तो रिझर्व खेळाडू म्हणून संघात असू शकतो, अशी चर्चा होताना दिसत आहे.