मुंबई : टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू अभिनेत्रीसोबत लग्न करत आहे. मनिष पांडे आज दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. कालच मनिष पांडेच्या नेतृत्वात कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये कर्नाटकने तामीळनाडूचा पराभव केला. तर मागच्याच महिन्यात विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्येही मनिष पांडेच्याच नेतृत्वात कर्नाटकने तामीळनाडूला पराभूत केलं होतं.
२६ वर्षांच्या अश्रिताने इंद्रजीत, ओरु कन्नयम मुनू कलावानिकलम, उदयम एनएच ४ यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१२ साली रिलीज झालेल्या तेलीकेडा बोली या चित्रपटातून अश्रिता शेट्टीने या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मनिष पांडेने लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच बोलावलं आहे. संपूर्ण रिती रिवाजानुसार हे लग्न २ दिवस चालणार आहे.
मनिष पांडे-अश्रिता शेट्टीआधी विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजल कीच, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा, मोहम्मद अजहरुद्दीन-संगीता बिजलानी, टायगर पतौडी-शर्मिला टागोर या क्रिकेटपटू-अभिनेत्रीच्या जोड्यांनी लग्न केलं.
२०१६ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सीबी सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये मनिष पांडेने ८१ बॉलमध्ये नाबाद १०४ रन करुन भारताला विजय मिळवून दिला होता. मनिष पांडेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे एकमेव शतक आहे. यानंतरही त्याला संधी मिळाली, पण या संधीचा त्याला फायदा उचलता आला नाही. पण भारत ए कडून खेळताना खेळाडू आणि कर्णधार म्हणून मनिष पांडेची कामगिरी चांगली राहिली.
मनिष पांडे आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. २००९ साली बंगळुरूकडून खेळताना हैदराबादविरुद्ध मनिष पांडेने नाबाद ११४ रनची खेळी केली होती. यानंतर मनिष पांडे पुणे आणि कोलकात्याकडूनही खेळला. २०१८ साली हैदराबादने मनिष पांडेला ११ कोटी रुपयांना विकत घेतलं, यामुळे मनिष पांडे हैदराबाद टीमचा सगळ्यात महागडा खेळाडू झाला. २०१९ साली हैदराबादने मनिष पांडेला टीममध्ये कायम ठेवले.