मुंबई : आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा प्रवास हा पराभवासह संपला. 11 ऑक्टोबर 2021 रोजी कोलकाता नाईट रायडर्सने शारजाहमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा 4 विकेट्स राखून पराभव केला. विराट कोहलीने आयपीएल 2021चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी म्हटलं होत की, स्पर्धा संपल्यानंतर तो आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार.
विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या प्रवासावर सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, प्रत्येकाचा निरोप हा विजयासह होईल असं नाही. गावस्कर यांच्या मते, स्क्रिप्ट नेहमी तुमच्यानुसार लिहिलेली नसते.
सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या परिस्थितीची तुलना डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी केली. ते म्हणाले, "हे निश्चितच निराशाजनक आहे. प्रत्येकाला मोठं होऊन फिनीश व्हायचं असतं. पण तुम्हाला काय हवं आहे किंवा चाहत्यांना काय हवं आहे त्यानुसार गोष्टी घडत नाहीत. स्क्रिप्ट नेहमी तुम्हाला हवी तशी लिहिलेली नसते."
ते म्हणाले, "प्रत्येकाच्या नशिबात विजयासह समाप्त लिहिलेला नसतो. डॉन ब्रॅडमनकडे पहा. त्यांना त्याच्या 100 च्या सरासरीसाठी फक्त चार धावांची गरज होती, पण ते त्यांच्या शेवटच्या डावात शून्यावर बाद झाले. सचिन तेंडुलकरला त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात शतक करायचं होतं, पण तसं झालं नाही.
विराट कोहली कदाचित आरसीबीला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देऊ शकला नसेल पण त्याने गेल्या काही वर्षांपासून जे काही फ्रँचायझीसाठी केलं आहे त्यावर प्रश्नचिन्ह होऊ शकतं, असंही गावस्कर यांना वाटतं.
आरसीबीसाठी कोहलीने काय केलं आहे यावर कोणी कधी वाद करू शकतो का? त्याने चांगली कामगिरी केली आहे. एक वर्ष असं होतं जेव्हा त्याने आयपीएलमध्ये टी-20 मध्ये 973 धावा केल्या.