माद्रीद : मेस्सीच्या बार्सिलोनाने चिरडलं रोनाल्डोच्या रेयाल माद्रीदला
रोनाल्डोनेसुद्धा मेस्सीप्रमाणेच पाचव्यांदा बॉलन डी पुरस्कार जिंकल्यामुळे दोघांत श्रेष्ठ कोण ही चर्चा रंगली होती. बार्सिलोना विरुद्ध रेयाल माद्रीद असा सामना होता. त्यामुळे साहजिकच दोघेही समोरासमोर येणार होते. कोण बाजी मारतं याबद्दल फूटबॉलप्रेमींमध्ये कमालीचं कुतुहल होतं.
मेस्सीच्या कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने रेयाल माद्रीदचा दणदणीत पराभव केला. मेस्सीने पेनल्टीवर एक गोल केला. तसंच उरलेले दोन गोल होण्यातसुद्धा त्याचा महत्त्वाचा वाटा होता. यामुळे आपणच श्रेष्ठ असल्याचं मेस्सीने सिद्ध केलं.
दोन्ही संघानी हा सामना प्रतिष्ठेचा केला होता. पण बार्सिलोनाने आपल्या कामगिरीच्या जोरावर निर्विवादपणे आपलं वर्चस्व सिद्ध केलं. त्याउलट रेयाल माद्रीदने मात्र धसमुसळा खेळ केला. गोल करता येत नसल्यामुळे ते निराश झाले होते. बार्सिलोनाचा गोलरक्षक स्टेजनची कामगिरीसुद्धा उत्तमच झाली. त्याच्यामुळेच रेयाल माद्रीदचे दोन प्रयत्न वाया गेले.