Mohammad Shami On Hardik Pandya Shouting Incident: सध्याच्या घडीला भारताच्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद शमीने आयपीएलमधील एका आठवणीला उजाळा देताना त्यावेळेस नेमकं काय घडलेलं याबद्दल भाष्य केलं आहे. आयपीएल 2022 मधील एका सामन्यात गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या शमीवर सामना सुरु असतानाच ओरडला होता. याचसंदर्भात शमीने आता भाष्य केलं आहे. 2022 चं आयपीएल हे हार्दिकसाठी कर्णधार म्हणून पहिलेच पर्व होते. तसेच ते गुजरातच्या संघासाठीही पहिलेच पर्व होते. या पर्वामध्ये हार्दिकने संघाला थेट जेतेपद मिळवून दिलं होतं. या विजयामुळे हार्दिकच्या नेतृत्व गुणांची सगळीकडेच चर्चा झाली. मात्र या कालावधीमध्ये त्याने अनेक चढ-उतारही पाहिले. अनेकदा तो मैदानात संतापायचा, आपल्या सहकाऱ्यांवर ओरडायचा. असाच एक प्रकाश शमीबरोबर घडला होता. फिल्डींग करताना झालेल्या एका छोट्याश्या चुकीमुळे हार्दिक सामना सुरु असतानाच बॉण्ड्री लाइनवर फिल्डींग करणाऱ्या शमीवर चिडला होता. तो मैदानात शमीवर ओरडल्याचं पाहायला मिळालं होतं.
शमीने एका मुलाखीतमध्ये हार्दिक पंड्याच्या या वागण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. नेमकं तेव्हा काय घडलेलं आणि या आरडाओरडीबद्दल आपली काय भूमिका आहे शमीने सांगितलं. शमीने यावेळेस हार्दिक आणि मी एकमेकांना मागील एका दशकाहून अधिक काळापासून ओळखत असल्याचं सांगितलं.
"मी सामान्यपणे अशा गोष्टींवर व्यक्त होत नाही. मात्र गोष्टी फारच बिघडतात तेव्हा मी बोलतो. आमच्यातील कनेक्शन छान आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. त्यावेळेस त्याच्या हे लक्षात आलं नाही. आण्ही दोघे एकमेकांना मागील 10 वर्षांपासून ओळखतो. तो मला म्हणाला, 'शपथ घेऊन सांगतो त्यावेळेस मी काय म्हणालो मला आठवत नाही," असं शमीने सांगितलं. एवढ्यावरच न थांबता नंतर आपण हार्दिकला सुनावल्याचंही सांगितलं.. "कोट्यवधी लोक आपल्याला स्क्रीनवर पाहत असतात. अशावेळेस आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असते," असं शमीने शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'
शमीने त्याच्या आयपीएलमधील प्रवासाबद्दलही या मुलाखतीत सांगितलं. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जसच्या संघाकडून कशी वागणूक मिळाली याबद्दलही शमी व्यक्त झाला. "दिल्लीने मला संघी दिली नाही. नंतर मी पुढील तीन वर्षामध्ये पंजाबकडून खेळताना 60 विकेट्स घेतल्या. त्यांनी मला रिटेन केलं नाही आणि त्यांनी मला गुजरातकडे सोपवलं," असं शमी म्हणाले. पुढील पर्वामध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्याला करारमुक्त केलं तरी हरकत नाही, असंही शमी स्पष्टपणे म्हणाला.
नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'
"मी 2 वर्षात गुजरातसाठी 48 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी मला रिटेन केलं नाही तर त्याचा काय फरक पडणार आहे? मला जो संघ निवडेल मी त्यांच्यासाठी खेळेल. तुम्हाला चांगली कामगिरी करणारा खेळाडू हवा असेल तर मला ठेवा. तुम्हाला चांगला दिसणारा खेळाडू हवा असेल तर दोन-तीन मॉडेल्स ठेवा," असा टोला शमीने लगावला.