MS Dhoni: झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. बीसीसीआयचे सध्याचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी झी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन 'Game Over'मध्ये अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे चेतन शर्मा यांचं पद धोक्यात आलंय. अशातच आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) नवा मुख्य निवडकर्ता (chief selector) बनवावा, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने बीसीसीआयला दिला आहे.
दानिश कनेरिया (dinesh kaneria) एका मुलाखतीदरम्यान म्हणतात... 'बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एमएस धोनीशी एकदा बोलावं. धोनीची योजना काय आहे आणि तो मुख्य निवडकर्ता होऊ शकतो का? हे त्यांनी विचारलं पाहिजे. आता बीसीसीआय (BCCI), रॉजर बिन्नी आणि जय शाह यांच्यावर कठोर कारवाई करून नवीन निवड समिती (Selection Committee) स्थापन करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य दानिश कनेरिया यांनी केलंय.
बीसीसीआयला आता निवड समितीमध्ये नवीन लोकांचा समावेश करण्याची गरज आहे. एमएस धोनीचे (MS Dhoni) डोकं कमालीचं आहे. तो योग्य निर्णय घेतो आणि तो एक महान खेळाडू आहे. असं असेल तर त्यांच्यासारखा खेळाडू निवड समितीत का नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 आणि ODI या दोन्ही प्रकारात ICC ची सिरीज जिंकली आहे. त्यामुळे धोनीची निवड चुकत नाही. त्यामुळे त्याला सिलेक्टर्स म्हणून संधी मिळाली, अशी मागणी केली जात आहे. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली. असं असलं तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. यंदाची आयपीएल धोनीसाठी अखेरची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता धोनी सिलेक्टर होणार का? अशी चर्चा होताना दिसते.