नागपूर : मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं ३१२ रन्स बनवून २ विकेट्स गमावल्या होत्या. पुजारा १२१ रन्सवर नाबाद आणि कॅप्टन विराट कोहली ५४ रन्सवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे १०७ रन्सची आघाडी आहे.
मुरली विजयचं टेस्ट क्रिकेटमधलं हे दहावं शतक होतं. दुखापतीमुळे मुरली विजय काही काळ क्रिकेटपासून लांब होता. तर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजयला संधी देण्यात आली नव्हती. पण शिखर धवननं या टेस्टमधून माघार घेतल्यामुळे विजयला संधी देण्यात आली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं.
मुरली विजयनंतर चेतेश्वर पुजारानं टेस्ट कारकिर्दीतलं त्याचं १४वं शतक झळकावलं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं ११/१ अशी केली होती. त्यानंतर पुजारा आणि विजयनं २१५ रन्सची पार्टनरशीप केली. मुरली विजय २२१ बॉल्समध्ये १२८ रन्स करून आऊट झाला.