Rohit Sharma IPL 2025 : रोहित शर्मा हा इंडियन प्रीमियरमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असून त्याने जवळपास 10 वर्ष मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. मात्र आयपीएल 2024 मध्ये मुंबईने हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवले. त्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीवर काहीसा नाराज असल्याचं बोललं जातं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या ऑक्शन आधी मुंबई इंडियन्सला राम राम ठोकू शकतो. जर रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिलीज केले तर कोलकाता आणि मुंबई वगळता इतर संघ रोहितला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक असतील. पंजाब किंग्स क्रिकेटचे विकास प्रमुखांनी रोहितला ऑक्शनमध्ये खरेदी करण्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
पंजाब किंग्स ही टीम इंडियन प्रिमीयर लीगच्या सुरुवातीपासून या स्पर्धेचा भाग आहे. मात्र अद्याप पंजाब किंग्सला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाबकडे चॅम्पियन बनण्याचा एक चांगला रोड मॅप आहे. टीमचे विकास प्रमुख आणि दिग्गज क्रिकेटर संजय बांगर यांच्या सोबत रोहित शर्माला घेऊन बोलणं झालं तेव्हा त्यांनी महत्वाचा खुलासा केला.
हेही वाचा : शिखर धवननंतर आता 'हे' क्रिकेटर्स निवृत्तीच्या वाटेवर, 'या' मराठमोळ्या खेळाडूचाही समावेश
एका युट्युब पॉडकास्टमध्ये संजय बांगर यांना रोहित शर्मा बाबत प्रश्न विचारण्यात आला. जर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करते तर पंजाब किंग्स रोहितला त्यांच्या टीममध्ये घेण्याविषयी विचार करेल का? यावर संजय बांगर यांनी म्हंटले, "याचा निर्णय ऑक्शनच्यावेळी टीमकडे उपलब्ध असलेल्या पैशांवर अवलंबून आहे. जर तो उपलब्ध होत असेल तर निश्चितच तो खूप जास्त किंमत मोजून खरेदी केला जाईल".
आयपीएल 2025 पूर्वी नियमांमध्ये काही बदल झाले आहेत. सुरुवातीला संघाना केवळ चार खेळाडूंना रिटेन करण्याचा पर्याय होता मात्र आता संघ ६ खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.