मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. आतापर्यंत ही मालिका भारतीय कर्णधार ऋषभ पंतसाठी फलंदाज म्हणून फारशी चांगली ठरली नाहीये. अशा परिस्थितीत आता त्याची नजर या सामन्यात चांगली फलंदाजी करण्यावर असेल. पण यापूर्वीच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने ऋषभ पंतचा मोठा कमकुवतपणा सांगितला आहे.
दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये तो ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल बोलत होता. दानिश म्हणाला, 'मी पंतबद्दल एक गोष्ट लक्षात घेतली, जेव्हा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करतो तेव्हा पंत विकेटकीपिंग करताना खाली बसत नाही. तो उभा राहतो.
कनेरिया पुढे म्हणाला, 'मला वाटतं ऋषभचं वजन जास्त आहे, त्यामुळे तो वेळेवर खाली बसल्यानंतर उठू शकत नाही. त्याच्या फिटनेसबाबत ही मोठी चिंतेची बाब आहे. तो 100 टक्के फिट आहे का?'
दानिश कनेरियाचा असा विश्वास आहे की कर्णधार म्हणून ऋषभ पंतला फलंदाज आणि गोलंदाजांनी खूप पाठिंबा दिला आहे. हार्दिक आणि दिनेश यांनी त्याला चांगली साथ दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मालिका विजेता ठरवेल. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकले, तर टीम इंडियाने तिसरा आणि चौथा सामना जिंकून कमबॅक केलं आहे. अशा स्थितीत आता भारताच्या युवा टीमला स्टार खेळाडूंशिवाय मालिका जिंकण्याची संधी असेल.