ICC ODI World Cup 2023 : खचाखच भरलेल्या मैदानात जेव्हा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि युवराज सिंह (Yuvraj Singh) खेळत होते. त्यावेळी अख्खं क्राऊड स्टेडियममध्ये वंदे मातरम म्हणत होतं. प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून आला होता. त्याला कारण देखील तसंच होतं. टीम इंडिया तब्बल 28 वर्षानंतर वर्ल्ड कप (ICC World Cup 2011) जिंकली होती. आता पुन्हा तिच संधी टीम इंडियासाठी चालून आली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये 12 वर्षानंतर पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे यंदा देखील रोहित सेना वर्ल्ड कप उंचावणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
आगामी एकदिवसीय विश्वचषकामध्ये प्रेक्षकांच्या उत्तुंग पाठिंब्याच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केलाय. त्यावेळी त्याने 2011 च्या आठवणी जाग्या केल्या. रोहित म्हणतो, 2011 चा वर्ल्ड कप आम्ही जिंकला. त्यावेळी मी संघात नव्हतो. त्या आठवणी माझ्यासाठी खूप ताज्या आहेत. मात्र, तो भूतकाळ आणि इतिहास आहे. त्यामुळे आता आम्ही वर्ल्ड कप जिंकूब अशी आशा आहे, असं रोहित शर्माने आयसीसीशी बोलताना म्हटलं आहे.
आगामी वर्ल्ड कपची प्रत्येकजण त्याची वाट पाहत आहे. 2 वर्षांनंतर भारतात हे घडतंय. आम्हाला मैदानावर जबरदस्त पाठिंबा मिळेल. आम्ही शेवटच्या वेळी 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले होते. 2016 मध्ये आम्ही 20 षटकांचा विश्वचषक खेळलो, पण 12 वर्षांनंतर देशात एकदिवसीय विश्वचषक होत असल्याने लोक खूप उत्सुक आहेत. त्यासाठी आता प्रचार देखील सुरू झाला आहे, असंही रोहित म्हणतो.
दरम्यान, रोहित शर्मा कितीही म्हणत असला तरी टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार तरी कसा? असा सवाल आता विचारला जात आहे. वर्ल्ड कपचा संघ म्हटलं तर फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन खेळाडूंची नावं समोर येतात. त्यामुळे संघात इतर खेळाडू कोण असतील. ओपनिंग पासून मिडल ऑर्डर अजूनही फिक्स नाही. मॅनेजमेंट सतत प्रयोग करत असल्याने संघातील इतर 9 खेळाडू कोण? यावर अजून प्रश्नचिन्ह काय आहे. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी पर्याय आहेत तरी कोणते? बुमराह फिट आहे की नाही? ऋषभ पंतचं काय होणार? केएल राहूल की श्रेयस अय्यर? अशी मोठी परीक्षा आता चीफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा दावा करतोय? की तोंडच्या वाफा सोडतोय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.