टी-20 वर्ल्डकपमध्ये आयर्लंडविरोधातील पहिल्या सामन्याआधी भारताने सराव सामना खेळला. या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) भेटण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षा भेदत मैदानात प्रवेश केला होता. चाहता मैदानात घुसताच सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि खाली जमिनीवर पाडलं. रोहित शर्मा यावेळी त्यांना इतक्या कठोरपणे त्याला हाताळू नका अशी विनंती करताना दिसला. आयर्लंडविरोधातील सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला या घटनेबद्दल विचारण्यात आलं. मात्र या घटनेसाठी खेळाडूंना प्रकाशझोतात आणणं रोहित शर्माला आवडलं नाही.
रोहित शर्माला पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आलं की, 'सराव सामन्यादरम्यान एक चाहता अचानक मैदानात घुसला होता. ज्याप्रकारे सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं, त्यानंतर तू त्यांना सहजपणे हाताळण्याची विनंती करत होतास. तुझ्या नेमक्या तेव्हा काय भावना होत्या?'. हा प्रश्न ऐकल्यानंतर रोहित शर्मा काहीसा नाराज दिसला.
"सर्वात आधी तर मी सांगेन की, कोणीही मैदानात अशाप्रकारे घुसखोरी करु नये. हे ठीक नाही आणि हा प्रश्नही योग्य नाही. याचं कारण हा प्रश्न योग्य नाही. आम्हाला कोण मैदानात धावत आहे, घुसखोरी करत आहे अशा गोष्टी प्रमोट करण्याची इच्छा नाही," असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
रोहित शर्माने यावेळी खेळाडू तसंच प्रेक्षकांची सुरक्षा यावरही भाष्य केलं. पण यासाठी काही नियम पाळण्याची गरज आहे असं रोहित शर्मा म्हणाला. "मला वाटतं की, ज्याप्रमाणे खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे बाहेरील लोकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. बाहेर बसलेल्या प्रेक्षकांनी प्रत्येक देशाचे काही नियम असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. ते समजून घेणं आणि त्यांचं पालन कऱणं महत्त्वाचं आहे. आता मी इतकंच बोलू शकतो. यापेक्षा जास्त काय बोलणार?," असं रोहित शर्माने म्हटलं.
"भारतात आणि येथे नियम वेगळे आहेत. त्यामुळे येथे नेमके काय नियम आहेत हे समजून घ्या. त्यांनी किती चांगले स्टेडिअम तयार केले आहात पाहा. तुम्ही आरामशीर सामना पाहू शकता. तुम्ही मैदानात धावण्याची, हे सर्व करण्याची गरज नाही," असं रोहित शर्माने सांगितलं.
"यामुळे आम्ही विचलित होण्याचं काही कारण नाही. आमचं लक्ष्य इतर गोष्टींवर आहे. आम्ही मैदानात कोण धावतंय आणि काय करायचं याकडे लक्ष देत नाही. कोणताही खेळाडू यामुळे विचलित होणार नाही. याचं कारण त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरु असतात. सामना कसा जिंकायचा, धावा कशा करायच्या, विकेट कशी घ्यायची? प्रत्येकजण हाच विचार करत असेल मला वाटत नाही की खेळाडू अशा गोष्टींनी विचलित होत असावेत," असं रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं.