शाहिद आफ्रिदीकडून कराचीच्या हिंदू मंदिरात अन्नधान्य वाटप

कोरोना व्हायरसने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही थैमान घातलं आहे.

Updated: May 14, 2020, 04:16 PM IST
शाहिद आफ्रिदीकडून कराचीच्या हिंदू मंदिरात अन्नधान्य वाटप title=

कराची : कोरोना व्हायरसने भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही थैमान घातलं आहे. पाकिस्तानात ३५ हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे तिथल्या लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. अशा लोकांच्या मदतीला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी धावून आला आहे. आफ्रिदी त्याच्या संस्थेच्या माध्यमातून गरिबांना अन्नधान्याचं वाटप करत आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदी कराचीच्या प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचला.

लक्ष्मी नारायण मंदिरात पोहोचल्यावर आफ्रिदीने मंदिरातल्या गरजू हिंदूंना रेशनचं वाटप केलं. आफ्रिदीचे लक्ष्मीनारायण मंदिरात रेशन वाटप करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. शाहिद आफ्रिदीने स्वत: ट्विटरवर हे फोटो शेयर केले आहेत. या संकटात आम्ही एकत्र आहोत. एकता हीच आमची शक्ती आहे, असं आफ्रिदी या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

शाहिद आफ्रिदीसोबत मंदिरात पाकिस्तानचे स्क्वॅश खेळाडू जहांगिर खानही होते. जहांगिर खान आफ्रिदी फाऊंडेशनचे अध्यक्षही आहेत. शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानमधल्या एका हिंदू टेनिस खेळाडूने व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सरकारवर हिंदूंना रेशन देत नसल्याचा आरोप करण्यात आला होता, यानंतर आफ्रिदी हिंदूंच्या मदतीला पुढे आला. शाहिद आफ्रिदीने त्याच्या संस्थेमार्फत हिंदूंसाठी सिंध प्रांताच्या बाकी भागांमध्येही रेशन वाटलं आहे.

एप्रिल महिन्यामध्ये युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. या दोघांनीही त्याच्या संस्थेला मदत केली होती. यानंतर युवराज आणि हरभजनला ट्रोल करण्यात आलं होतं. 

शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदतीचं आवाहन, टीकेनंतर युवराजने मौन सोडलं