रांची : भारताच्या भेदक बॉलिंगपुढे दक्षिण आफ्रिकेची पुन्हा भंबेरी उडाली आहे. रांचीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्येही दक्षिण आफ्रिकेला फॉलो-ऑन मिळाला आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये ४९७ रन केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग फक्त १६२ रनवर संपुष्टात आली. यामुळे टीम इंडियाला ३३५ रनची आघाडी मिळाली. फॉलो-ऑन मिळाल्यानंतर पुन्हा बॅटिंगला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पुन्हा सुरुवातीला धक्के लागले.
पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेकडून झुब्यार हमझाने सर्वाधिक ६२ रनची खेळी केली.
३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने आधीच २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. विशाखापट्टणम आणि पुण्यात झालेल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला आहे. रांचीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्येही विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश करण्याची नामी संधी विराट कोहलीच्या टीमला चालून आली आहे.