Champions Trophy 2025 : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असतानाच तिथं संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या गौतम गंभीर यांच्या एका वक्तव्यामुळं साऱ्यांचं लक्ष पुन्हा एकदा संघातील खेळाडूंच्या प्राधान्यक्रमाकडे वळलं. गंभीर यांनी स्पष्ट सांगितल्यानुसार संघात विकेटकीपर म्हणून केएल राहुल यालाच पहिली पसंती दिली जाईल. तर, विकेटकीपिंगसह फलंदाजीतही समाधानकारक कामगिरी करणारा ऋषभ पंत मात्र इथं पर्यायी खेळाडू राहणार असून, त्याचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल असं गंभीरनं स्पष्ट केलं आहे.
इंग्लंडविरोधातील तीन एकदिवसीय सामान्यांसाठी संघाची निवड करत ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांच्यामध्येही पंतला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पहिल्या दोन सामन्यांमध्ये केएल राहुलला सहाव्या स्थानी फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. पण, तिथंही तो समाधानकारक कामगिरी करताना दिसला नाही. तिसऱ्या सामन्यात मात्र त्याला पुन्हा त्याच्या आधीच्याच स्थानी म्हणजे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. जिथं त्यानं 29 चेंडूंवर 40 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं.
इथं त्याच्या खेळाची चर्चा होत असतानाच तिथं गंभीरनं केएल आजही आपला पहिल्या क्रमांकाचा विकेटकीपर असल्याचं सांगत तूर्तास आपण इतकंच काय ते सांगू शकतो असं स्पष्ट केलं. पंतला संधी मिळेल पण सध्या राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळं आपण दोन विकेटकीपर फलंदाजांसह खेळूच नाही शकत असं स्पष्टीकरणही त्यानं दिलं.
संघात राहुलचं स्थान अबाधित असल्याचं सांगताना गंभीरनं पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला सहाव्या स्थानी खेळण्यासाठी का पाठवलं या प्रश्नाचंही उत्तर दिलं. संघात कोणाही व्यक्तीपेक्षा एखाद्या निर्णयाचा संघाला किती फायदा होईल याचाच विचार केंद्रस्थानी असतो. सरासरी आकडेवारीवर लक्ष न देता कोणता खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहे यावरून त्याचं महत्त्वं निर्धारित केलं जातं.
गंभीरनं एकंदर केलेलं वक्तव्य पाहता इंग्लंडच्या सामन्यांप्रमाणं आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुललाच प्राधान्य मिळणार असल्याचे संकेत दिल्यानं संघातील राहुलच्या स्थानावर आता प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याची बाब नाकारता येत नाही.