Jay Shah : श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जय शाह हे श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत, असा हास्यास्पद आरोप अर्जुन रणतुंगा (Arjun Ranatunga) यांनी केला होता. 2023 च्या क्रिकेट वर्ल्डकपमधील श्रीलंका संघाच्या सुमार कामगिरीवरुन रणतुंगा यांनी ही जय शाह यांच्यावर टीका केली होती. मात्र आता श्रीलंकेच्या सरकारला (Sri Lankan government) जय शाह यांची माफी मागावी लागली आहे. श्रीलंका सरकारने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची औपचारिक माफी मागितली आहे.
माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर केलेल्या हास्यास्पद वक्तव्याबद्दल श्रीलंका सरकारला माफी मागावी लागली आहे. रणतुंगाने विचित्र वक्तव्य करून श्रीलंकेच्या क्रिकेटच्या परफॉमन्ससाठी जय शाह यांना जबाबदार धरले होते. यानंतर 1996 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधारावर जोरदार टीका करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेला आता जय शाह यांची माफी मागावी लागली आहे.
काय म्हणाले होते अर्जुन रणतुंगा?
"श्रीलंका क्रिकेटचे अधिकारी आणि जय शाह यांच्या संबंधांमुळे बीसीसीआयला असं वाटतं की, ते श्रीलंकेचं क्रिकेट नियंत्रित करू शकतात. जय शाह श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत. जय शाह यांच्या दबावामुळे श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त होत आहे. भारतातील एका व्यक्तीमुळे श्रीलंकेच्या क्रिकेटचं हे नुकसान होत आहे. जय शाह हे केवळ त्यांचे वडील अमित शाह भारताचे गृहमंत्री आहेत म्हणून इतके शक्तीशाली आहेत," असं अर्जुन रणतुंगा यांनी म्हटलं होतं.
श्रीलंका सरकारने मागितली माफी
शुक्रवारी संसदीय अधिवेशनादरम्यान श्रीलंका सरकारचे मंत्री हरिन फर्नांडो आणि कांचना विजेसेकेरा यांनी रणतुंगा यांच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की ही जबाबदारी बाह्य संस्थांऐवजी श्रीलंकेच्या प्रशासकांची आहे. "सरकार म्हणून आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांच्याकडे खेद व्यक्त करतो. आमच्या संस्थांच्या उणिवांसाठी आम्ही आशियाई क्रिकेट परिषदेचे सचिव जय शाह किंवा इतर देशांना दोष देऊ शकत नाही. हे चुकीचे आहे," असे मंत्री विजेसेकेरा म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी श्रीलंकेच्या संसदेत यावरून बराच वाद देखील झाला. विजेसेकेरा आणि हरिन फर्नांडो या मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली. आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर निलंबनाची कारवाई करण्यामागे त्यांनी अंतर्गत समस्यांना जबाबदार धरले आहे.