कोलंबो : श्रीलंकेचा क्रिकेटपटू अजंथा मेंडीसनं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून त्यानं निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ट्विट करत याबाबत माहिती दिली. अजंथा मेंडीस यांच्या गोलंदाजीचा सामना करणं अनेक क्रिकेटपटूंसाठी आव्हानात्मक होतं. कारण त्याचा गोलंदाजीची शैली ही रहस्यमय होती. मेंडीसनं ८७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५२ गडी बाद केले आहेत. तर १९ कसोटीमध्ये ७० फलंदाज बाद केले असून ३९ टी-ट्वेन्टीमध्ये ६६ गडी बाद केले आहेत.
मेंडीसने शेवटचा सामना २०१५ मध्ये न्यूझीलंडच्या विरोधात क्राइस्टचर्चमध्ये खेळला होता. ३४ वर्षाच्या मेंडीसची बॉलिंग सुरुवातीला कोणालाच लक्षात येत नव्हती. त्यामुळे तो जगभरात प्रसिद्ध झाला. मेंडीसच्या बॉलिंगने मोठ्या फलंदाजांना देखील हैराण केलं होतं. पण भारताचा क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने मात्र मेंडीसच्या बॉलिंगवर फटकेबाजी करत पहिल्यांदा त्याची दहशत संपवली होती.
वेस्टइंडीजच्या विरोधात एप्रिल २००८ मध्ये त्याने ऑफ स्पिन बॉलर म्हणून पदार्पण केलं होतं. मेंडिसने पदार्पण केलं त्याच वर्षी आशिया कपमध्ये फायनलमध्ये भारताच्या ६ विकेट घेत फक्त १३ रन दिले होते. वनडेमध्ये जलद ५० विकेट घेण्याचा रेकॉर्ड मेंडिसच्या नावावर आहे. त्याने १९ सामन्यांमध्ये ५० विकेट घेतल्या होत्या. भारताचा माजी खेळाडू अजीत अगरकर आणि न्यूझीलंडचा मिशेल मॅक्लेनघनने २३ सामन्यांमध्ये ५० विकेट घेतले आहेत.