मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजही रद्द करण्यात आली. देशातली सध्याची परिस्थिती पाहता आयपीएल रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. आयपीएल रद्द झालं तर बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.
बीसीसीआयला नुकसान झालं तर खेळाडूंनी पगार कपातीसाठी तयार राहावं, असं वक्तव्य इंडिया क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी केलं होतं. अशोक मल्होत्रा यांच्या या वक्तव्याचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी समाचार घेतला आहे. त्यांना हे बोलण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल गावसकर यांनी विचारला आहे.
'प्रत्येक खेळाच्या नियमांप्रमाणे जर तुम्ही खेळला नाही तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत. बीसीसीआयच्या मर्जीत येण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असल्यास समजू शकतो, पण त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का? सध्याचे आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असोसिएशनचे सदस्य नाहीत, त्यामुळे मल्होत्रा खेळाडूंच्या बाजूने बोलू शकत नाहीत. तुमच्या खिशाला कात्री लागत नसेल तेव्हा पगार कपातीबाबत बोलणं सोपं असतं,' अशी टीका गावसकर यांनी केली आहे.
अशोक मल्होत्रा यांच्या या वक्तव्यावर बीसीसीआयने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांचं हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितलं आहे. 'खेळाडूंच्या पगार कपातीबाबत चर्चा झाली नाही. याबाबत आम्ही विचारही केलेला नाही. कोणावरही परिणाम होणार नाही, असा निर्णय आम्ही घेऊ. गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर याबाबत चर्चा होऊ शकते,' असं अरुण धुमाळ म्हणाले.