आयपीएलआधी रैनाची बॅट तळपली, रेकॉर्डचा पाऊस

भारतीय क्रिकेट टीममधून गेल्या काही दिवसांपासून बाहेर असलेल्या सुरेश रैनाची बॅट सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 टूर्नामेंटमध्ये तळपली आहे. 

Updated: Jan 22, 2018, 05:06 PM IST
आयपीएलआधी रैनाची बॅट तळपली, रेकॉर्डचा पाऊस  title=

कोलकाता : भारतीय क्रिकेट टीममधून गेल्या काही दिवसांपासून बाहेर असलेल्या सुरेश रैनाची बॅट सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 टूर्नामेंटमध्ये तळपली आहे. कोलकाताविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये रैनानं शानदार शतक झळकवलं आहे. या शतकाबरोबरच रैनानं रेकॉर्डचा पाऊस पाडला आहे.

सोमवारी कोलकात्यामध्ये बंगाल विरुद्ध उत्तर प्रदेशची मॅच झाली. पहिले बॅटिंग करायला उतरलेल्या उत्तर प्रदेशची पहिली विकेट लवकर गेली. पण त्यानंतर बॅटिंगला आलेल्या रैनानं आकाशदीप नाथसोबत बंगालच्या बॉलरचा धुव्वा उडवला.

रैनानं एस.चौधरीसोबत ५४ रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर आकाशदीपसोबत रैनानं १६३ रन्सची पार्टनरशीप करून बंगालच्या टीमला बॅकफूटवर पाठवलं. रैनानं ४९ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं. रैनानं ५९ बॉल्समध्ये १२६ रन्स केल्या. यामध्ये १३ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. रैनाच्या या वादळी खेळीमुळे उत्तर प्रदेशनं २३५ रन्स केल्या.

या शतकाबरोबरच रैनानं अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर केले. भारतात टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स, शतक आणि रन्स बनवण्याच्या रेकॉर्डमध्ये रैनानं अनेक दिग्गजांची बरोबरी केली.

भारतात सर्वाधिक सिक्स लगावणारे खेळाडू

क्रिस गेल- २८८

रोहित शर्मा- २०९

सुरेश रैना- २०२

युसुफ पठाण- १९२

एमएस धोनी- १८७

युवराज सिंग- १८२

विराटनंतर दुसरा खेळाडू

या शतकानंतर सुरेश रैना जगातला ९वा आणि भारताचा दुसरा असा खेळाडू बनला आहे ज्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त रन्स आहेत. याआधी विराट कोहलीनं टी-20 क्रिकेटमध्ये ७ हजार रन्स केले आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक

सुरेश रैना आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर तिसरा असा भारतीय खेळाडू बनला आहे ज्यानं टी-20 क्रिकेटमध्ये ४ शतकं लगावली आहेत. रैनानं वर्ल्ड टी-20, आयपीएल, चॅम्पियन्स लीग आणि मुश्ताक अली टी-20 मध्ये शतकं लगावली आहेत.

मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक स्कोअर

सुरेश रैना सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू बनला आहे. याआधी २०१३ साली उन्मुक्त चंदच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. उन्मुक्त चंदनं त्यावेळी १२५ रन्सची खेळी केली होती. याचबरोबर उत्तर प्रदेशच्या टीमचा या टूर्नामेंटमधला हा दुसरा सर्वात जास्त स्कोअर आहे. याआधी दिल्लीनं २०१६मध्ये २३६ रन्स बनवल्या होत्या. या मॅचमध्ये उत्तर प्रदेशनं ३ विकेट गमावून २३५ रन्स केल्या होत्या.