T-20 मध्ये एकट्याचेच 16 Sixes! 21 बॉलमध्ये 116 रन... पाकिस्तानी गोलंदाजांची Record ब्रेकिंग धुलाई

World Record Batting 16 Sixes: त्याने अनेक विश्व विक्रमांशी बरोबरी केली. मात्र या साऱ्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांची फारच धुलाई या फलंदाजाने केल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 17, 2024, 10:36 AM IST
T-20 मध्ये एकट्याचेच 16 Sixes! 21 बॉलमध्ये 116 रन... पाकिस्तानी गोलंदाजांची Record ब्रेकिंग धुलाई title=
विश्वविक्रमी कामगिरीशी केली बरोबरी

World Record Batting 16 Sixes: न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलेनने बुधवारी विक्रमी कामगिरी केली. फिन एलेनच्या फलंदाजीच्या वादळात पाकिस्तानी गोलंदाजांची भांबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं. डुनेडिनच्या मैदानावर फिनने क्रिकेट चाहत्यांच्या नजरेचं पारणं फेडणारी फलंदाजी केली. एलेनने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये तुफानी खेळी केली. एलेनने 62 बॉलमध्ये 5 चौकार आणि 16 षटकारांच्या मदतीने एकट्यानेच 137 धावा केल्या.

वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या एलेनने पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली. एलेनने या खेळीत अनेक विक्रम आपल्या नावे केले. फिन एलेनने 16 षटकार लगावत एकाच टी-20 खेळीमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या विश्व विक्रमाशी बरोबर केली. यापूर्वी असा पराक्रम अफगाणिस्तानचा फलंदाज हजरतुल्लाह जजईने केला होता. हजरतुल्लाहने 23 फेब्रुवारी 2019 रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 162 धावांची वैयक्तिक खेळी करताना 16 षटकार लगावले होते. 

हा विक्रम मोडला

फिन एलेनने 137 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने न्यूझीलंडकडून खेळताना टी-20 मध्ये सर्वाधिक धावांची वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावे करुन घेतला. एलेनने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रॅण्डन मॅक्युलमचा विक्रम मोडीत काढला. मॅक्युलमने 21 सप्टेंबर 2012 रोजी पल्लेकलमध्ये बंगलादेशविरुद्धच्या सामन्यात 123 धावांची खेळी केली होती.

हा ही विक्रम स्वत:च्या नावे केला

ब्रॅण्डन मॅक्युलमचा आणखी एक विक्रम फिन एलेनने मोडीत काढला. केवळ चौकार, षटकार लगावत एलेनने 116 धावा केल्या. 16 षटकारांमधून 96 धावा आणि 5 चौकारांच्या 20 धावा अशा 116 धावा त्याने चेंडू सीमेपलीकडे धाडून मिळवल्या. अशाप्रकारे चौकार-षटकारांमधून सर्वाधिक धावा करणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या यादीतही एलनने मॅक्युलमपेक्षा वर झेप घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. ब्रॅण्डन मॅक्युलमच्या नावे चौकार-षटकारांमधून एकाच खेळीत 96 धावा करण्याचा विक्रम होता. 

टी-20 मधला हा विक्रमही मोडला

फिन एलेनने टी-20 अंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम नावावर केला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने हा विक्रम करत कोरी अॅण्डरसनच्या विक्रम मोडला आहे. कोरीने एकाच सामन्यात 10 षटकार लगावले होते.

पाकिस्तानचा व्हाइट वॉश

फिन एलेनच्या विक्रमी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला व्हाइट वॉश दिला आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या मोबदल्यात 224 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानला 7 विकेट्सच्या मोबदल्यात 20 ओव्हरमध्ये 179 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडने हा सामना 45 धावांनी जिंकला. यापूर्वीच्या सामन्यांपैकी पहिला सामना न्यूझीलंडने 46 तर दुसरा सामना 21 धावांनी जिंकला होता. न्यूझीलंडने मालिका 3-0 ने जिंकली आहे.