Player Smoking In Dressing Room Viral Video: पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद युनायटेडच्या संघातून खेळणारा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम हा सध्या वादात अडकला आहे. रविवारी या स्पर्धेच्या अंतीम सामन्यामध्ये इमादने भन्नाट कामगिरी केली. इमादने मुलतान सुलतान संघाच्या 5 खेळाडूंना तंबूत परत पाठवल्याने मुलतानच्या संघाला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. इमादने केलेली कामगिरी ही त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक ठरली. मात्र तो सध्या वादात अडकलाय एका वेगळ्याच कारणामुळे.
मैदानात सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर इमाद जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये गेला तेव्हा त्याने केलेल्या एका कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. इमाद हा ड्रेसिंग रुममधून संघाची फलंदाजी पाहत असताना चक्क सिगारेट पीत असल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. इमादवर कॅमेरा आल्याची त्याला थोडीही कल्पना नव्हती. कॅमेराने इमादवर झूम केल्यानंतर त्याच्या डाव्या हातात सिगारेट असल्याचं दिसत. तो सिगारेटचा एक झुरका मारतो. त्यानंतर तो स्वत:च्या उजवकीडे पाहतो तेव्हा कॅमेरा आपल्यावर फोकस असल्याचं त्याला दिसतं. कॅमेरा आपल्यावर नजर ठेऊन असल्याचं पाहिल्यानंतर इमादच्या हावभावावरुनच तो चिडल्यासारखं जाणवतं. तो हळूच डाव्या हातातील सिगारेट विझवत असल्याचं त्याच्या हावभावावरुन दिसून येतं. मात्र आपण कॅमेरात कैद होत असल्याचं इमादला समजेपर्यंत त्याचा सिगारेट पितानाचं कृत्य रेकॉर्ड झालेलं.
इमादचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानमधीलच अनेक चाहत्यांनी आपला संताप व्यक्त करताना ही पाकिस्तान सुपर लीग आहे की पाकिस्तान स्मोकिंग लीग? असा सवाल उपस्थित केला आहे.
PAKISTAN "SMOKING" LEAGUE #HBLPSL9 #HBLPSLFinal pic.twitter.com/pwpaj4bLh8
— Farid Khan (@_FaridKhan) March 18, 2024
दरम्यान, अंतिम सामन्यामधील इमादने 4 ओव्हरमध्ये 23 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केल्याने इस्लामाबाद युनायटेडसमोर अंतिम सामना जिंकण्यासाठी 160 धावांचं माफक आव्हान होतं. मात्र या धावसंख्येचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेडच्या संघाला बरीच कसरत करावी लागली. अखेर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर संघाने विजय मिळवत स्पर्धा जिंकली.
नक्की पाहा >> 'त्या' फोटोमुळे चहलच्या संसारात मीठाचा खडा? भावनिक होत धनश्री म्हणाली, 'तुमच्या आई, बहिण..'
"हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम स्पर्धा ठरेल असं वाटलं नव्हतं. संघाच्या विजयामध्ये आपलं भरीव योगदान असावं असं वाटत होतं. अंतिम सामन्यात 5 विकेट्स घेणे हा माझ्यासाठी हा फारच नवीन अनुभव होता. यामधून मला आपण एक ओव्हर आधीच सामना संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही शिकवण मिळाली. मला क्रिकेट खेळायला मिळत आहे याचाच आनंद आहे. माझ्या संघासाठी शक्य ते योगदान देण्याचा माझा प्रयत्न असतो. मी अजून 4 ते 5 वर्ष क्रिकेट खेळू शकतो," असं इमादने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना म्हटलं.