मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. गेल्या अडीच वर्षापासून त्याला शतक ठोकता आले नाहीये. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. त्याच्या या वाईट काळात त्याच्यावर टीकाही होतेय आणि त्याची बाजूही घेतली जातेय. मात्र या सर्वांत आता त्याने मोठं विधान केलं आहे.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या निवेदनात कोहली म्हणालाय, 'टीम इंडियाला आशिया कप आणि विश्वचषक जिंकण्यात मदत करणे हे माझे ध्येय आहे. यासाठी जे काही करावे लागेल, त्यासाठी मी तयार असल्याचे त्याने सांगितले आहे.
यंदाचा आशिया कप यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या दोन्ही मोठ्या स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये असतील.
विराटला विश्रांती
इंग्लंडनंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचली आहे. येथे भारतीय संघ विंडीजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. शिखर धवन याचे नेतृत्व करत आहे. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. या दोन्ही मालिकांसाठी विराट कोहलीची निवड करण्यात आली नव्हती.