IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे मैदानात विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचं (Team India) नेतृत्व करताना दिसला. सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दुसरी इनिंग सुरु असताना भर मैदानात कर्णधार कोहलीने असे काही इशारे केले ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होतं आहे. ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु असताना विराट मैदानात सॅण्डपेपर कृत्यावरून ऑस्ट्रेलियन फॅन्सला डिवचलं आणि त्यांची खिल्ली उडवली.
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात पाचवा टेस्ट सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकून टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 185 धावा केल्या. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये 181 धावांवर ऑल आउट केले. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मोठं आव्हान देण्याकरता फलंदाजीसाठी उतरली खरी मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी अटॅक समोर 157 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 158 धावांचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. दरम्यान दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या केवळ ४ विकेट्स घेऊ शकले. दरम्यान स्टीव्ह स्मिथची विकेट पडल्यावर मैदानात विराट कोहलीने केलेल्या इशाऱ्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फॅन्स यांची मैदानावरील जुगलबंदी काही औरच असते. बऱ्याचदा ऑस्ट्रेलियन फॅन्स विराट कोहलीला चिडवताना दिसतात. तर विराट कोहली देखील त्याच्या स्टाईलने त्यांना उत्तर देत असतो. असंच काहीस मैदानात स्टीव्ह स्मिथची विकेट पडल्यावर झालं. स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यावर प्रेक्षक कोहलीला ओरडू लागले. तेव्हा विराटने सॅण्डपेपरच्या कृतीची नक्कल करत प्रतिक्रिया दिली. सध्या विराटचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. 2018 मध्ये कॅमेरून बॅनक्रॉफ्ट मैदानात अशी अॅक्शन करताना दिसला होता. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरसोबतच कॅमेरून बॅनक्रॉफ्टही 'सॅण्डपेपर कॉन्ट्रोव्हर्सी' मध्ये अडकला होता. ज्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आली होती.
हेही वाचा : सामना हरले, सीरिज हरले, WTC फायनलमधून बाहेर पडले पण... भारतासाठी एकमेव गुडन्यूज!
2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट जिंकणं अत्यंत महत्वाचं होतं. मात्र आता सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची टेस्ट सीरिज 3-1 ने जिंकल्यामुळे आता साऊथ आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये क्वालिफाय झाली आहे.