'मी आणि सगळेच तुझ्या पाठीशी असून, तू फार...'; RCB नव्या कर्णधाराला विराट कोहलीने दिल्या शुभेच्छा

21मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL च्या आगामी हंगामासाठी आयपीएल फ्रँचायझी आरसीबीने गुरुवारी रजत पाटीदारची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. गेल्या वर्षीच्या मोठ्या लिलावापूर्वी RCB ने राखलेल्या खेळाडूंमध्ये रजत पाटीदारचा समावेश होता.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 13, 2025, 04:14 PM IST
'मी आणि सगळेच तुझ्या पाठीशी असून, तू फार...'; RCB नव्या कर्णधाराला विराट कोहलीने दिल्या शुभेच्छा title=

21 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी आयपीएल फ्रँचायझी आरसीबीने रजत पाटीदारची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षीच्या मेगा लिलावापूर्वी RCB ने राखलेल्या खेळाडूंमध्ये रजत पाटीदारचा समावेश होता आणि त्याला सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (T20) आणि विजय हजारे ट्रॉफी (ODI) मध्ये मध्य प्रदेशचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.

RCB चा नवा कर्णधार कोण? 

31 वर्षीय रजत पाटीदारने 2022 मध्ये फ्रँचायझीसोबत करार केला होता. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जिथे त्याने गेल्या वर्षी मुंबईकडून 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. उजव्या हाताचा फलंदाज अजिंक्य रहाणेनंतर सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने 10 सामन्यांमध्ये 61 च्या सरासरीने आणि 186.08 च्या स्ट्राईक रेटने 428 धावा केल्या होत्या.

विराट त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान क्रिकेटपटूच्या नेतृत्वाखाली खेळणार 

आरसीबीची घोषणा होण्यापूर्वी, विराट कोहलीच्या कर्णधारपदी पुनरागमनाबद्दल वेगवेगळे अंदाज लावले गेले होते. विराट कोहली 2013 ते 2021 पर्यंत आरसीबीचा कर्णधार होता. त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट होता. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजेतेपद जिंकता आले नाही. विराट कोहलीने 143 सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे. जे चेन्नई सुपर किंग्जसाठी महान महेंद्रसिंग धोनीनंतर कर्णधार म्हणून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त काळ आहे. 36 वर्षीय विराट कोहली आता त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेल्या क्रिकेटपटूच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

विराट कोहलीची प्रतिक्रिया

विराट कोहलीने रजत पाटीदारला कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला की, 'रजत, मी आणि संघातील इतर सदस्य तुझ्यासोबत आहोत. या फ्रँचायझीमध्ये तू ज्या पद्धतीने प्रगती केली आहेस आणि ज्या पद्धतीने तू कामगिरी केली आहेस, त्यामुळे तू सर्व आरसीबी चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहेस. तू त्यासाठी पात्र आहेस अशी प्रतिक्रिया दिली आहे.