भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाची दयनीय अवस्था झाल्याने माजी क्रिकेटर केविन पीटरसन प्रचंड नाराज आहे. केविन पीटरसनने इंग्लंस संघावर निशाणा साधताना खेळाडूंनी नेट गोलंदाजांचा सामना करायला हवा होता, तसंच फिरकी खेळण्याच्या क्षमतेवरही लक्ष केंद्रीत करायला हवं होतं असं मत मांडलं आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी योग्य अभ्यास न केल्याने केविन पीटरसनने खडेबोल सुनावले आहेत.
इंग्लंडचा भारत दौरा फारच निराशाजनक राहिला. या दौऱ्यात टी-20 मालिका 1-4 ने गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेत 0-3 ने क्लीन स्वीप मिळाला आहे. इंग्लंडने दौऱ्याच्या सुरुवातीपूर्वी कोलकाता येथे पहिला टी-20 सामना खेळण्यापूर्वी दोन सराव सत्रं आयोजित केली होती. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या 20 सामन्यापूर्वी त्यांनी अनुक्रमे चेन्नई आणि राजकोट येथे प्रत्येकी एक सराव सत्र आयोजित केले होते.
तथापि, पाहुण्या संघाने पुणे आणि मुंबई येथे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यापूर्वी सराव केला नाही. कटक आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी संघाने सराव सत्रेही आयोजित केली नाहीत.
I’m sorry, but I am absolutely gobsmacked that England did not have ONE team practice session since losing the 1st ODI and losing the T20 series.
How can this be?
Seriously, how?
I believe Joe Root was the only player to have a net this series, post Nagpur.
There isn’t a…— Kevin Pietersen (@KP24) February 12, 2025
केविन पीटरसनने एक्सवर लिहिलं आहे की, "मला खेद आहे, पण मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटत आहे की इंग्लंडने पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर आणि टी-20 मालिका गमावल्यानंतरही एकही अभ्यास सत्र आयोजित केला नाही. हे कसं काय होऊ शकतं? खरंच कसं काय? मला वाटतं नागपूरनंतर फक्त जो रुटने नेट प्रॅक्टिस केली".
पुढे त्याने म्हटलं आहे की, "या ग्रहावर असा एकही खेळाडू नाही जो प्रामाणिकपणे म्हणू शकेल की, पराभव होत असतानाही सराव न करता ते सुधारणा करतील. इंग्लंड संघात असा एकही खेळाडू नाही जो भारत सोडताना विमानात बसून स्वतःला म्हणू शकेल की, त्याने इंग्लंडला जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि त्यामुळेच मला खूप दुःख झाले आहे.
"जर तुम्ही दररोज सुधारणा करण्यासाठी सर्वोत्तम देत असाल तर पराभव ठीक आहे. इंग्लंडने या मालिकेत सराव केला नाही म्हणजे त्यांनी प्रयत्न केले नाहीत. इंग्लंडच्या कोणत्याही चाहत्यासाठी हे हृदयद्रावक आहे," असं केविन पीटरसन म्हणाला आहे.