...अन् विवाहित महिलेने कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या लोन रिकव्हरी एजंटशी केलं लग्न, कारण ऐकून चक्रावून जाल

पवन कुमार यादव कर्जाचे हफ्ते न चुकवल्याने जाब विचारण्यासाठी आला असता त्याची आणि इंद्र कुमारी यांची भेट झाली. यानंतर त्यांच्यात व्यावसायिक गप्पा सुरु झाल्या अन् नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.   

शिवराज यादव | Updated: Feb 13, 2025, 01:50 PM IST
...अन् विवाहित महिलेने कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या लोन रिकव्हरी एजंटशी केलं लग्न, कारण ऐकून चक्रावून जाल title=

बिहारमध्ये एका महिलेने सतत छळ करणाऱ्या पतीला कंटाळून कर्जाचे थकलेले हफ्ते गोळा करण्यासाठी आलेल्या लोन रिकव्हरी एजंटशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. लोन रिकव्हरी एजंट कर्जाचे पैसे मिळव्यासाठी सतत घरी येत असे. इंद्र कुमार असं या महिलेचं नाव असून 2022 मध्ये तिचं नकुल शर्माशी लग्न झालं होतं. नकुल दारुच्या आहारी गेला होता. मद्यपान करुन तो इंद्र कुमारीचा छळ करत असते. इंद्र कुमारी आपला शारिरीक आणि मानसिक छळ सहन करत असे. यादरम्यान आपण यातून कशी सुटका करुन घ्यायची याचा विचार करत होते. 

यादरम्यान तिची फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या लोक रिकव्हरी एजंट पवन कुमार यादवशी भेट झाली. पवन कुमार कर्जाचे थकलेले हफ्ते मिळवण्यासाठी घरी गेले असता त्यांच्यात व्यावसायिक चर्चा सुरु झाली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. 

जवळपास पाच महिने दोघेही गुप्तपणे नात्यात होते. 4 फेब्रुवारीला त्यांनी विमानाची तिकीट काढली आणि पश्चिम बंगालमधील आसनोल येथे पोहोचले. तिथे इंद्र कुमारीची मावशी वास्तव्यास आहे. तिथे काही दिवस राहिल्यानंतर ते जमुई येथे परतले. 11 फेब्रुवारीला त्यांनी हिंदू पद्धतीने विवाह केला. या लग्नाला त्यांच्या ओळखीतील, नात्यातील अनेक लोक उपस्थित होते. यानंतर काही वेळातच त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

पवनच्या कुटुंबाने या लग्नाला मान्यता दिली. पण इंद्र कुमारीच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. इंद्राने आपण आपल्या स्वेच्छेने पवनशी लग्न केल्याचं सांगितलं आहे. पवनविरोधात एफआयआर दाखल झाला असल्याने आणि इंद्राच्या कुटुंबाकडून धमक्या मिळत असल्याने या नवविवाहित जोडप्याने प्रशासनाकडून संरक्षण मागितलं आहे.