AR Rahman on Ranveer Allahbadia's Controversy : कॉमेडियन समय रैना हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा पॉडकास्टर रणवीर अलाहबादियानं समय रैनाच्या या शोमध्ये आई-वडिलांच्या शारिरीक संबंधांवर एक वादग्रस्त वक्तव्य करत त्याची खिल्ली उडवली. त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी रणवीर अलाहबादियाच्या या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
खरंतर, रणवीरच्या या वक्तव्यानंतर लेखक, सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेकांना नाराजी व्यक्त केली आहे. रणवीर अलाहबादिया आणि अपूर्वासोबत 6 लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की गुवाहाटीमध्ये इंडियाज गॉट लेटेंटच्या टीमवर अभद्रता पसरवण्यासंबंधीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. समय रैनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या एपिसोडचे सगळे व्हिडीओ काढून टाकणरा असल्याची माहिती दिली. या सगळ्यात आता छावा चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च कार्यक्रमात ए आर रहमाननं नाव न घेता रणवीरच्या या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बुधवारी छावा या चित्रपटाचा म्युजिक लॉन्च कार्यक्रमात ए आर रहमान देखील दिसला. त्यानं या चित्रपटासाठी म्युजिक दिलं आहे. या दरम्यान, म्युजिक लॉन्च कार्यक्रमात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना देखील दिसले. खरंतर, यावेळी ए आर रहमाननं एक कमेंट केली ज्यामुळे त्यानं नाव न घेता त्यानं रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ए आर रहमानला विचारण्यात आलं की त्याच्या म्युजिकला तीन इमोजीमध्ये सांगायला सांगितलं तर कोणतं इमोजी वापरशील. त्याचं उत्तर देत त्यानं सांगितलं की 'ते जे इमोजी असतं तोंड बंद असतं ते.' हे इमोजी का निवडलं हे सांगत ए आर रहमान म्हणाला, या आठवड्यात आपण सगळ्यांनी पाहिलं की तोंड उघडल्यावर काय काय होऊ शकतं. तर ए आर रहमानच्या या कमेंटवर विकी कौशलला त्याचं हसू अनावर झालं आणि त्यानं हसत म्हटलं की 'रोस्टिंगविषयी बोला.' त्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की ही कमेंट रणवीर अलाहबादियासाठी आहे.
हेही वाचा : 'अंदाज अपना अपना' पुन्हा होणार प्रदर्शित; तर चाहत्यांनी केली Tere Naam री-रिलीजची मागणी
'इंडियाज गॉट लेटेंट'मधील रणवीर अलाहबादियाची कमेंट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यानं सोशल मीडियावर सगळ्यांची माफी देखील मागितली. त्यानं म्हटलं की 'मी जे वक्तव्य केलं ते फक्त चुकीचं नव्हतं, तर त्यासोबत मस्करी करण्यासारखं नव्हतं. मी फक्त तुमची माफी मागतोय.'