'Welcome to Mars' म्हणत एलॉन मस्कनं थेट मंगळावर केलं स्वागत; Video मध्ये पाहा भविष्यकालीन सिटीस्केप आणि बरंच काही....

एलॉन मस्कने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन पुन्हा एकदा मंगळ ग्रहाच्या चर्चेला उधाण आणलं आहे. हा 12 सेकंदाचा व्हिडीओ AI द्वारे तयार केला असून भविष्यकालीन मंगळाचे दृश्य साकारलं गेलं आहे. 

Updated: Feb 13, 2025, 01:29 PM IST
'Welcome to Mars' म्हणत एलॉन मस्कनं थेट मंगळावर केलं स्वागत; Video मध्ये पाहा भविष्यकालीन सिटीस्केप आणि बरंच काही.... title=

Elon Musk Video : टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क आता नवनवे प्रोजेक्ट आणि मंगळावर मानवी वस्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अधिक वाव देताना दिसत आहे. एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स (SpaceX) येत्या दोन वर्षात आपले सर्वात मोठे रॉकेट स्टारशिप मंगळ ग्रहावर पाठवण्यासाठी योजना आखत आहे. 

मंगळावर रॉकेटच्या सुरक्षित लँडिंगची चाचणी घेण्यात येणार असल्याची घोषणा एलॉन मस्कनं केली होती. अशातच, एलॉन मस्कने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन पुन्हा एकदा मंगळ ग्रहाच्या चर्चेला उधाण आणलं आहे. हा 12 सेकंदाचा व्हिडीओ AI द्वारे तयार केला असून भविष्यकालीन मंगळाचे दृश्य साकारलं गेलं आहे. या व्हिडीओबद्दल नेटकऱ्यांच्या मनात कुतूहल दिसून येत आहे. मस्कनं व्हिडीओसोबत “Welcome to Mars” (मंगळावर तुमचे स्वागत आहे) असे कॅप्शन लिहिले आहे.

एलॉन मस्कची पोस्ट

या व्हिडीओमध्ये मंगळावरील आधुनिक शहरासह आकर्षक स्पेसशिप पाहायला मिळत आहे. मंगळावरील भव्य शहराचे हे दृश्य मस्कनं प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केले आहे. तसेच, एलॉन मस्क मंगळावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी मंगळावर मानवरहित अंतराळयान 2025 या वर्षात पाठवण्याच्या योजना आखत आहे.

 

एलॉन मस्कची 2016 मधील भविष्यवाणी

मस्कनं 2016  मध्ये मंगळावर मानवी वस्ती निर्माण करणार असल्याची संभाव्यता व्यक्त केली होती आणि त्याच्या दहा वर्षांनंतर मस्कनं मंगळावरील भविष्यकालीन मानवी वस्ती आणि प्रगत शहराचा व्हिडीओ शेअर केला आहे. 2016  मध्ये रेकॉर्ड कोडच्या मंचावर आपल्या मंगळावरील आपल्या योदनांसंदर्भात मत व्यक्त करताना मस्क म्हणाला, "जर सर्व गोष्टी माझ्या प्लॅननुसार होत गेल्या तर नक्कीच 2024 ते 2025 मध्ये नक्कीच मनुष्य मंगळावर वास्तव्य करु शकतील." लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळावर पृथ्वीप्रमाणेच मनुष्य जगू शकेल आणि लोकशाहीला धरुन शासनाचे कामकाज चालू शकेल, असे प्रगत शहराचे चित्र मस्कने प्रेक्षकांच्या मनात तयार केले. 

सोशल मिडीयावरील प्रतिक्रिया

एलॉन मस्कची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यासंबंधी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायल्या मिळाल्या. नेटकऱ्यांनी कुतूहलामुळे अनेक प्रश्न उभे केले. एकाने, "मंगळावरील पहिल्या शहराचे नाव काय असेल?" असा प्रश्न विचारला. तर दुसऱ्याने "मंगळावर मनुष्य श्वास घेऊ शकेल का?" असा प्रश्न विचारला. बऱ्याचजणांनी मंगळावरील वातावरण, झाडाझुडपांचा अभाव तसेच तिथल्या शहराच्या निर्मितीबद्दल खंत व्यक्त केली.

मस्क यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पृथ्वीप्रमाणे मानवी अस्तित्वाला मंगळावर वाव मिळेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकं वर काढताना दिसत आहे.