मुंबई : यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरल्यामुळे अंबाती रायडूला इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागलं आहे. तर संजू सॅमसनही यो-यो टेस्टमध्ये पास होऊ न शकल्यामुळे भारतीय ए टीममध्ये सहभागी होऊ शकला नाही. इंग्लंड दौऱ्याआधी टीममध्ये निवड झालेल्या सगळ्या खेळाडूंना यो-यो टेस्टला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर यो-यो टेस्ट खरंच एवढी महत्त्वाची आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फक्त यो-यो टेस्ट हाच निवडीचा मापदंड नसावा अशी प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू कपील देव यांनी दिली आहे. बीसीसीआयमधूनही यो-यो टेस्टला विरोध होऊ लागला असल्याचं बोललं जात आहे.
कोणत्याही दौऱ्यासाठीच्या संघनिवडीदरम्यान टीम मॅनेजमेंटकडून क्रिकेटर्सची यो-यो फिटनेस टेस्ट घेतली जाते. या फिटनेस टेस्टमध्ये पास झालेल्या क्रिकेटर्सनाही संघात स्थान दिले जाते. केवळ बीसीसीआयच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडूनही ही टेस्ट घेतली जाते.
बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंनी या टेस्टमध्ये पास होण्यासाठी १९.५ गुण मिळवणे गरजेचे असते. त्याखालील गुण मिळवणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिले जात नाही. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटर्ससाठी ही एक मोठी परीक्षाच असते. यात काही टेस्टचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ रन बिटवीन द लाईन्स सारख्या टेस्ट घेतल्या जातात. केवळ क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल आणि हॉकीच्या खेळाडूंचीही अशाच प्रकारे टेस्ट होते.
यो-यो टेस्ट नेमकी कशी होते याची माहिती माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं दिली आहे.