मुंबई : भारतीय क्रिकेट संघात आजवर बऱ्याच खेळाडूंनी फक्त मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही उल्लेखनीय कामगिरी करत क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. अशा काही खेळाडूंमध्ये येणारं नाव म्हणजे महेंद्रसिंह धोनी. धोनी मैदानावर जितक्या प्रभावीपणे वावरतो तितकाच तो मैदानाबाहेर व्यक्ती म्हणूनही अनेकांचीच मनं जिंकतो.
धोनीचं असंच एक सुरेख रुप व्ही.व्ही.एस लक्ष्मण याने सर्वांसमोर आणलं.
२००८ मध्ये ज्यावेळी लक्ष्मणने त्याच्या कारकिर्दीत १०० कसोटी सामने पूर्ण केले तेव्हा त्या सामन्यानंतर चक्क माहिनेच संघाची बस चालवली होती. मैदानापासून हॉटेलपर्यंत त्याने स्वत: बस चालवत संपूर्ण संघाला नेलं होतं.
त्याच सामन्यामध्ये अनिल कुंबळे याने क्रिकेट विश्वाला राम-राम ठोकला होता. ज्यानंतर धोनीच्या हाती संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार धोनीविषयी ही सुरेख आठवण सांगत लक्ष्मण म्हणाला, 'धोनीसोबतच्या एखाद्या आठवणीविषयी सांगावं तर, माझ्या १०० व्या कसोटी सामन्याच्या दिवशी त्याने मैदानापासून हॉटेलपर्यंत बस चालवत नेली होती. संघाचा कर्णधार बस चालवत आपल्याला हॉटेलपर्यंत नेत आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. धोनीने नेहमीच प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. त्याच्यासारख्या कोणत्याही व्यक्तीला मी भेटलेलो नाही', असं लक्ष्मणने त्याच्या '२८१ अॅण्ड बियॉण्ड' या पुस्तकात लिहिलं आहे.
धोनीच्या 'कूल' अर्थातच शांत स्वभावाविषयी सांगत लक्ष्मणने तो कधीही कोणत्याही अडचणीच्या किंवा आव्हानात्मक प्रसंगाच्या वेळी कधीही संतापलेला किंवा चिडचीड करणारा व्यक्ती म्हणून समोर आल्याचं पाहायला मिळालं नाही. याचच उदाहरण देत त्याने २०११ मधील भारत विरुद्ध इंग्लंडमधील मालिकेतील आठवणींची जोड दिली आहे.
धोनीची ही बाजू पाहता तो खरंच एक खेळाडू म्हणून जितका समृद्ध आहे, तितकाच एक व्यक्ती म्हणूनही सर्वांच्या मनात आदराचं स्थान मिळवून जातो, असं म्हणायला हरकत नाही.